
पणजी : गोव्याची सार्वजनिक वित्तीय क्षेत्रातील (Goa) कामगिरी प्रभावी ठरली आहे. अरुण जेटली राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन संस्थेने (Arun Jaitley National Institute of Financial Management) नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार सार्वजनिक वित्तीय कामगिरी क्रमवारीत गोवा ०.६८ गुणांसह देशात तिसऱ्या स्थानी राहिला आहे. गोव्याने अचिव्हर (Goa Achiever) ही श्रेणी मिळवली आहे.
या क्रमवारीत ओडिशा (०.७८) आणि गुजरात (०.७०) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. याची राष्ट्रीय सरासरी ०.५८ गुण इतकी आहे. संस्थेने सर्व राज्यांच्या मागील दहा वर्षांच्या लेखापरीक्षण केलेल्या वित्तीय माहितीच्या आधारे ही क्रमवारी जाहीर केली आहे.
संस्थेने क्रमवारी तयार करताना आर्थिक व्यवस्थापनाच्या (Finance Management) सहा मुख्य तसेच २३ उपश्रेणीत प्रत्येक राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता.
राज्यांना सहा श्रेणीत गुण देऊन नंतर एकूण गुण ठरवण्यात आले होते. यामध्ये संसाधने, खर्च, तूट, कर्ज, अवलंबी दायित्व (देणी), अतिरिक्त खर्च यांचा समावेश होता. याशिवाय राज्याचा स्वतःचा तसेच एकूण महसूल, खर्चात विकासकामे, शिक्षण, आरोग्य यासाठी केलेला खर्च, वित्तीय तूट, जीएसडीपी, एकूण दायित्व, महसूल खर्च, अनुदान, निवृत्ती वेतनावरील खर्च या बाबींचा देखील विचार करण्यात आला होता.
संसाधन व्यवस्थापन या श्रेणीत गोवा ०.८६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या श्रेणीत तामिळनाडू पहिल्या स्थानी आहे. खर्चाच्या व्यवस्थापनात गोव्याला कमी गुण मिळाले. या श्रेणीत गोवा दहाव्या स्थानी आहे.
वित्तीय तूट व्यवस्थापन श्रेणीत गोवा तिसऱ्या, कर्जाचे व्यवस्थापन श्रेणीत नवव्या, अवलंबिदायित्व श्रेणीत चौथ्या तर अतिरिक्त अपव्यय ( खर्च) या श्रेणीत गोवा ०.७१ गुणांसह सातव्या स्थानी आहे.
अहवालात गोव्यासह अन्य १७ राज्ये सर्वसाधारण गटात समाविष्ट केले आहे. तर ईशान्येकडील आठ राज्यांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना विशेष गटात समाविष्ट केले आहे.