
पणजी : गोव्यातील (Goa) महामार्गावर भटकी गुरे, म्हशींमुळे (Stray Cattle) वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी माशे, काणकोण (Canacona) येथे मोटरसायकलची धडक भटक्या गुरांना बसून झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला होता तर एक युवक जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भटक्या गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वास्को (Vasco) येथेही भटक्या गुरांची समस्या वाढली आहे.
दाबोळी विमानतळासमोरील (Dabolim Airport) महामार्गावर म्हशींचे बस्तान असते.

याठिकाणी महामार्गावरील दुभाजकामध्ये असलेली हिरवळ तसेच इतर झाडे खाण्यासाठी म्हशी याठिकाणी येत असतात व ठाण मांडून राहतात. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.
चिखलीतील गोठ्यात बांधलेल्या म्हशींचा मोठा कळप सकाळी सोडल्यानंतर रस्त्यावरून जात असतो. त्यामुळे याठिकाणी वाहनांची कोंडी होत असते. गुरे, म्हशी रस्त्यांवर सोडून अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या मालकांवर कठोर कारवाई करावी व ही समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी लोक करीत आहेत.
