जीएसपीसीबीच्या नावे होऊ लागली पैशांची मागणी; तोतयांपासून सावधान!

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
जीएसपीसीबीच्या नावे होऊ लागली पैशांची मागणी; तोतयांपासून सावधान!

पणजी :  गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (जीएसपीसीबी) (Goa State Pollution Control Board) (GSPCB) अधिकारी, कर्मचारी असल्याची बतावणी करून विविध कामे करून देण्याच्या बहाण्याने  उद्योजक, व्यावसायिकांकडून पैसे मागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशा तोतया अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन जीएसपीसीबीने केले आहे. 

यासंदर्भात माहिती देताना जीएसपीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी असल्याची बतावणी करून काही व्यक्ती गोव्यातील उद्योजक, व्यावसायिक आस्थापनांशी संपर्क करीत आहेत. आणि उद्योग, आस्थापन बंद करण्याचा प्रस्ताव  बोर्डाच्या कार्यालयात तयार झाल्याचे सांगत आहेत.

प्रकरण निस्तरण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी अमुक रक्कम लाच म्हणून द्यावी, अशी सरळ मागणी करतात. उद्योग, व्यवसायांना संमती देण्याच्या बहाण्यानेही लाच मागतात व जीएसपीसीबीची बॅंक खाती आहेत; त्यात शुल्क जमा करण्यास सांगतात व फसवणूक करतात.

जीएसपीसीबीच्या बनावट लेटरहेडवर संमती आदेश व इतर कागदपत्रे दाखवत असतात. मंडळाने स्पष्ट केले आहे की, जीएससीपीबीचे कर्मचारी, अधिकारी संमती देण्यासाठी किंवा अधिकृत कागदपत्रे, संमती आदेशांची तरतूद करण्यासाठी कुणाकडूनही शुल्क किंवा पैसे मागत नाहीत.

यासंदर्भात मंडळाने पोलीस अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा बनावट लोकांची माहिती जीएसपीसीबीला कळवावी असे आवाहन केले आहे.

मदत कक्ष 

उद्योजक, व्यावसायिकांना मदत करण्यासाठी मंडळाचा मदत कक्ष आहे. समस्या, मदतीसाठी या मदत कक्षावर (मोबाइल क्रमांक 9356709461) संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. बनावट व्यक्तींनी कुठल्याही प्रकारे संपर्क केल्यास दक्षता अधिकारी, वरिष्ठ पर्यावरण अभियंता, सदस्य सचिव कार्यालय व जीएसपीसीबी यांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. 


हेही वाचा