रेंट अ कॅब चोरल्याच्या संशयावरून खून

कपिल चौधरी खून प्रकरण : रेंट अ कॅब व्यावसायिकाला अटक, अन्य तिघे ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
रेंट अ कॅब चोरल्याच्या संशयावरून खून

पिर्ण, बार्देश येथील कपिल चौधरी (१९) या युवकाच्या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी रेंट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे (३१, कांदोळी, बार्देश) याला अटक केली आहे. कपिलने भाड्याने घेतलेली थार जीप गोव्याबाहेर नेली होती. जीप चोरल्याच्या संशयावरून त्याला लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून ठार मारण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

दरम्यान, पोलिसांंनी रेंट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याला अटक केली असून अन्य तिघांंना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी खरगाळी, कान्सा, थिवी सीमेवरील पठारी भागात एक युवक निपचित अवस्थेत सापडला. स्थानिकांनी कळविल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी कपिलने रेंट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याच्याकडून जीए-०३-एएच-५२५४ क्रमांकाची थार जीप भाड्याने घेतली होती. दीपक ठाकुर याच्या नावावरील पॅनकार्डच्या आधारे ही कार त्याने घेतली होती. नंतर वाहन ट्रॅकरवरून कार गोव्याबाहेर बांदा, महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याचे समोर आले. ही माहिती मिळाल्यानंतर जीप चोरून नेत असल्याच्या संशयावरून गुरुदत्त लवंदे आपल्या मित्रांसह किया सेल्टोस कारने त्या थारचा पाठलाग करू लागला. अखेर कणकवली, महाराष्ट्र येथे कार सापडली. त्यांनी कपिलला कारसह गोव्यात आणून थिवी येथे जबर मारहाण केली. लाकडी दांड्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

खुनानंतर आरोपींनी जवळच्या दुकानातून दारू विकत घेऊन एक बाटली कपिलच्या खिशात ठेवली, जेणेकरून त्याचा मृत्यू दारूच्या नशेत झाला असे वाटावे. त्यानंतर त्याचा मृतदेह थिवीतील पठारावर फेकून संशयित पसार झाले.

लवंदेकडून खुनाची कबुली

कोलवाळ पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनंतर रेंट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सहकाऱ्यांसह खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला रितसर अटक केली असून, या प्रकरणातील अन्य तिघांंना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोलवाळ पोलिसांनी सांगितले की, कपिल चौधरीचा मृत्यू हा पूर्वनियोजित रागातून झालेला खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर संशयितांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा