मोकाट गुरांना पायबंद कधी?

काणकोणात रात्रीच्या वेळी दुचाकीची धडक मोकाट बैलाला बसून एका भावी डॉक्टरचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. एखादा अपघात घडतो आणि त्यात गुरांचाही बळी जातो किंवा ती जायबंदी होतात. मोकाट गुरांना आवरण्याबाबत चर्चा तेवढ्यापुरती होते, प्रत्यक्षात कार्यवाही शून्य. हे चक्र कुठेतरी थांबायला हवे. सरकारने त्यासाठी गांभीर्याने पावले उचलायला हवीत.

Story: वर्तमान |
9 hours ago
मोकाट गुरांना पायबंद कधी?

निरुपद्रवी म्हणून ओळखली जाणारी गुरे आता माणसांच्याच जीवावर उठत असल्याचे चित्र राज्यात दिसून येते. गावातील अंतर्गत मार्ग असो, शहरातील एखादा हमरस्ता असो किंवा कोणताही महामार्ग असो, भटक्या गुरांचे बस्तान नाही, असा भाग सापडणे मुश्कील आहे. या गुरांमुळे अपघातांना निमंत्रण मिळते आणि लोकांना यात एक तर नाहक जीव गमवावा लागतो किंवा जायबंदी व्हावे लागते. माशे-काणकोण येथे परवा घडलेला अपघात हे याचे ताजे उदाहरण. एखाद्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला कायमच्या वेदना देणारी भटकी गुरे कशी नियंत्रणात आणायची, यावर सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल.

कारवार मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आदर्श पुजारी (२३, रा. गोकाक, जि. बेळगाव) हा दुचाकीवरून रात्रीच्या वेळी मित्रासोबत काणकोणहून कारवारकडे जात होता. रात्री जेवणासाठी ते दोघे काणकोण येथे थांबले होते. तेथून कारवारकडे येत असताना माशेजवळ रस्त्यावर मोकाट बैल आडवा आला. त्याला दुचाकीची धडक बसली. यात आदर्श याचा मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला रौनक चापला हा गंभीर जखमी झाला. अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या त्या उमद्या युवकाच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? आदर्शच्या रूपात एक भावी डॉक्टर समाजाने गमावला.

मोकाट गुरांमुळे अशा प्रकारचे अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत, मात्र त्याची गंभीर दखल घेण्याची तसदी सरकार घेताना दिसत नाही.

राज्यातील बहुतेक मार्गांवर रात्रीच्या वेळी मोकाट गुरे मोठ्या संख्येने भटकत असतात. यातील अनेक रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसतो. अपघात होण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. भटक्या गुरांमुळे होणारे अपघात हे गोव्यातील रस्ते सुरक्षेसाठी मोठे आव्हान बनले आहे. महामार्गांवर रात्रीच्या वेळी गुरे अचानक वाहनांसमोर आल्याने अपघात होतात. अनेक मोटारसायकलस्वार या अपघातांचे बळी ठरले आहेत. काही वेळा मोठ्या वाहनांची धडक बसून गुरांचाही बळी जात असल्याच्या घटना अधूनमधून समोर येतात. भटक्या गुरांचे प्रमुख कारण म्हणजे काही पशुपालकांची जबाबदारी न घेण्याची प्रवृत्ती. दूध काढून झाल्यावर काही लोक गुरांना सोडून देतात. वाढते शहरीकरण व चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरे अन्नाच्या शोधात रस्त्यांवर येतात. अशा बेफिकीर लोकांमुळे सार्वजनिक जागांवर, बाजारपेठेत आणि शाळांच्या परिसरात गुरे फिरताना दिसतात. कचरा डेपो, डम्पिंग यार्ड आणि रस्त्याकडील कचरापेट्यांमध्ये ही जनावरे अन्न शोधतात. त्यातून प्लास्टिक, काच, टाकाऊ अन्न खाल्ल्याने त्यांचे आरोग्य बिघडते आणि त्यांचा मृत्यू होतो. या समस्येला ज्याप्रमाणे बेफिकीर पशुपालक जबाबदार आहेत, त्याचप्रमाणे सरकारही तितकेच जबाबदार आहे.

गोवा हे पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे; पण वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या गुरांमुळे विदेशी पर्यटकांसमोर राज्याची चुकीची प्रतिमा निर्माण होते. गोवा सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने आपल्यापरीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. मात्र, ते प्रयत्न पुरेसे नाहीत. काही स्वयंसेवी संस्थांमार्फत नगरपालिका, पंचायती भटक्या जनावरांना पकडून गोशाळांमध्ये त्यांची रवानगी करतात. पाळीव गुरांची ओळख पटविण्यासाठी आरएफआयडी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन टॅगचाही वापर केला जातो. मात्र, गोशाळांची अल्प संख्या आणि क्षमतेच्या मर्यादा, तसेच देखभालीचा खर्च या अडचणींमुळे या प्रयत्नांना मर्यादा पडतात.

मोकाट गुरांमुळे ज्या समस्या उद्भवतात, त्या दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह सामाजिक सहभागही अत्यावश्यक आहे. प्रत्येक पाळीव पशूची ओळख निश्चित करण्यासाठी टॅग आणि मालकाची नोंद अनिवार्य केल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात सुटू शकते. कारण यातून त्या गुरांची ओळख तत्काळ पटेल आणि संबंधित पशुपालकावर कारवाई करणे सोपे जाईल, जेणेकरून अशा प्रकारे गुरे मोकळी सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. लोकसहभागातून तालुका पातळीवर सार्वजनिक गोशाळा किंवा शेल्टर होम सुरू करण्याचा विचार सरकारने करायला हवा. त्यातून मोकाट गुरांची समस्या तर सुटेलच, शिवाय रोजगारनिर्मितीही होऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. सर्व वयोगटांच्या माध्यमातून भटक्या गुरांना कसा आवर घालता येईल, याचा गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा.


सचिन खुटवळकर 
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)