उच्च शिक्षण संचालनालय-स्किलिंग इन्स्टिट्यूटमध्ये करार

उच्च शिक्षण संचालनालय आणि स्किलिंग इन्स्टिट्यूटमधील सामंजस्य करारावेळी उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रसाद लोलयेकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील सरकारी महाविद्यालयांतील कला आणि वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठी उच्च शिक्षण संचालनालय आणि हुबळी येथील देशपांडे एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या स्किलिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गुरुराज देशपांडे व अन्य उपस्थित होते.
करारानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘स्किलप्लस’ हा एक अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून देण्यात येईल. यानुसार विद्यार्थ्यांचा संवाद, विश्लेषण आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला जाईल. या महिन्यात खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा रोजगारासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सध्याच्या उद्योग क्षेत्राच्या आवश्यकतांनुसार रोजगारयोग्य कौशल्यांनी सुसज्ज केले जाईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला व्यावहारिक प्रशिक्षणासह पूरक करणे व याद्वारे गोव्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रोजगारक्षमता परिसंस्था मजबूत करणे हाही या कराराचा हेतू आहे.
कर्मचाऱ्यांना देशपांडे स्किलिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण
सरकारी महाविद्यालयांमधील निवडक कर्मचाऱ्यांना देशपांडे स्किलिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. याद्वारे त्यांच्यातील कौशल्य आधारित शिक्षण, नेतृत्वगुण तसेच अंमलबजावणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम उच्च शिक्षण संचालनालय व सहभागी महाविद्यालयांमध्ये दीर्घकालीन संस्थात्मक क्षमता निर्माण करेल. यामुळे ते स्वतंत्रपणे कौशल्य केंद्रित कार्यक्रम तयार करू शकतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण रोजगार आणि इंटर्नशिपसाठी मार्ग तयार करेल. एकूणच हा सामंजस्य करार शैक्षणिक अभ्यासक्रम आणि रोजगारक्षमतेतील अंतर भरून काढण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल ठरणार आहे.