काजूर

केपे तालुक्यातील 'काजूर' गाव हा घनदाट जंगल, प्राचीन संस्कृती आणि निसर्गाशी एकरूप झालेल्या लोकांचा अनमोल ठेवा आहे. 'दुधाफातर' आणि 'बेताळवळ' यांसारख्या खुणांतून गावाचा समृद्ध वारसा स्पष्ट होतो.

Story: लोकगंध |
9 hours ago
काजूर

रस्ता नागमोडी... वळणावळणाची वाट, सभोवताली सह्याद्रीच्या पर्वतरांगा... रस्त्याच्या दुतर्फा आताच कुठेतरी ऐन भरात आलेले शेत. मुख्य रस्त्यावरून गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला गाडी लागली आणि पिकलेल्या भाताचा वेगळाच गंध नाकात शिरला. खूप वर्षांनी हा गंध असा स्पर्शून गेला. डोंगराच्या पायथ्याशी वसलेला हा गाव चीचेपान्न, नाणेगोठण, वसडे आणि केगदीवाडो अशा चार वाड्यांचा, घनदाट जंगलाचा. बेताळवळ, चानोळ्या पाईक, आंबेघाट पाईक या जागेकरांच्या सुरक्षा कवचात निर्धास्त होऊन कष्ट करणाऱ्या माणसांचा हा गाव. खूप जुना, प्राचीन, साठा पुरीसांचा. त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा ठिकठिकाणी दिसतात.

त्यातील एक ठळक खूण म्हणजे दुधाफातर. एक दगड जो शेतात न जाणो कित्येक वर्षांपासून सभोवताली जे काही घडत आहे त्याचा मूक साक्षीदार असलेला दिसतो. लोकांनी त्याला बघितले. त्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावर त्यांनी उभ्या-आडव्या कित्येक रेघा बघितल्या. त्यांना ते गूढ, रहस्यमय वाटले. कुठलीतरी अज्ञात शक्ती त्यांनी त्या निर्जीव दगडात अनुभवली. त्यातील देवतत्वाला पुजायला सुरुवात केली. त्या रेघांनी त्यांना पांढरा दूध-सदृश्य पदार्थ असल्याचे जाणवले . त्यांनी त्याचे नामकरण ‘दुधाफातर’ केले. अभ्यासकांनी, इतिहास संशोधकांनी त्यावरील रेघोट्यांचे मर्म उलगडून प्रस्तररेखाचित्रे अजरामर केली. गाव किती जुना जाणता आहे यावर शिक्कामोर्तब झाले.

तिथून जवळच पाईक देवाची छोटी घुमटी होती. आता त्याचे रूपांतर एका छोटेखानी मंदिरात झाले आहे. याच मंदिराबाहेर एका बाजूने तारफातर तर दुसऱ्या बाजूला वाघाफातर असे दगड आहेत. हे दोन्ही दगड मूकपणे इथल्या पुरातन वारशाची संस्कृती जतन करीत असलेले दिसतात. कधी काळी या दगडांनाही सहृदयतेने अनुभवत काही परंपरा, रूढीचे पालन लोकमानसाने केले. मुलगी वयात येण्यापूर्वीच तेव्हाची लग्ने बालपणी व्हायची. दिवजा उत्सवाच्या वेळी नवीन लग्न झालेले जोडपे तिथे यायचे. दगड उचलायचे आणि त्या दगडाखाली एक तांब्याचा पैसा, ज्याला तार संबोधत असत, तो ठेवून मग दिवज जत्रेत सहभागी व्हायचे. ही अशी प्रथा कालांतराने बंद पडली. तो दगड तिथेच आहे. आजही वर्षातून एकदाच, ते सुद्धा दिवजोत्सवाच्या दिवशी महिलांना पाईक देवाच्या मंदिरात प्रवेश आहे. अन्यथा इतर दिवशी महिलांनी तिथे जायचे नाही असा लोकसंकेत आहे.

वाघाफातराच्या उरातही अशीच कथा दडलेली आहे. माणसे आणि घरांपेक्षाही झाडांचा सहवास या गावाला दाटीवाटीने वेढून आहे. त्यामुळे साहजिकच मृग कुळातील जनावरे, वाघ व इतर हिंस्त्र जनावरांच्या सोबतीने माणसांनाही राहण्याची सवय झालेली होती. चुकून हातातून वाघाची शिकार झाली, स्वसंरक्षण करताना वाघ जखमी होऊन मृत्युमुखी पडला, तर त्याची बाधा होता कामा नये म्हणून मग तिथे जवळच असलेल्या वाघांमळ जागेतील माडतीच्या झाडावर वाघाचे शव ठेवून त्याची श्रद्धेने पूजा करण्याची परंपरा गावात होती. जनावरे आणि वृक्षवेलींच्या सान्निध्यात राहून त्यांच्याप्रती कायमस्वरूपी कृतज्ञता बाळगणारा हा विचार किती महान होता, याविषयीचे चिंतन-मनन स्वतःला आधुनिक सुशिक्षित समजणाऱ्या समाजमनाने जरूर करायला हवे.

बेताळवळचीही अशीच एक कथा. कोणी एके काळी म्हणे विरुद्ध जातीतील दोघेजण या घनदाट जंगलातून चालत येत होते. त्यातील उच्चवर्णीय व्यक्तीच्या हातात लांब, मोठी बेतकाठी होती. तिथे जवळ पाणी पाहून ते जेवावयास बसले. जेवायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला? एकच केळीचे पान होते. त्यांनी शक्कल लढवली. केळीचे पान मध्ये आडवे ठेवून, दोघेजण दोन्ही बाजूला बसले. केळीच्या पानाच्या मधोमध जाड आणि काहीसा खोल असा शिरेचा भाग असतो. या भागाला प्रतीकात्मक ‘वळ’ म्हणजेच ओहोळ असे कल्पून 'तू ओहोळाच्या त्या तडीला तर मी या तडीला' असे सांगून मनाचे समाधान करून घेतले. जेवण आटोपून ते पुन्हा मार्गस्थ झाले. मात्र, या गडबडीत उच्चवर्णीय बेतकाठी मात्र तिथेच विसरून आला. त्यावेळेपासून म्हणे या जागेला ‘बेताळवळ’ असे संबोधले जाते.

ही गोष्ट आहे केपे तालुक्यातील ‘काजूर’ या छोट्या परंतु नैसर्गिक संपत्तीचा आगर असलेल्या गावाची. या गावातील लोककलाकार भीक वेळीप यांनी सांगितलेली ही माहिती. गावचा इतिहास, संस्कृती, झाडेपेडे, दगड-धोंडे, माणसे, सण-उत्सव, लोकसंस्कृती यांची खडानखडा माहिती ओठावर असलेली ही व्यक्ती अवलियाच म्हणावी लागेल. वय वर्षे ऐंशी, परंतु स्मृती अजूनही तल्लख. चौरंग, आरत्या, जती, इतकेच नाही तर महिला गात असलेल्या लग्नगीतांचीही त्यांची जाण मोठीच आहे. त्यांचा उत्साह, शब्दफेक, गावाची ओढ, संस्कृतीविषयीचे प्रेम सारे सारे अचंबित करणारे. “आमगेले जाणटे शिकूक नासले, ते अडाणी. तांच्यानी किद सांगले ते आमी आयकले.. ते कौरावांक ‘खैरू’ म्हणटाले.. जाल्यार अभिमन्युक ‘उभेवन’ आमगेल्या जाणट्याचे आमी मानले... आमगेले भुरगे आता मानतले अश दिसना,” भीक वेळीप मनापासून वास्तव अधोरेखित करीत होते. जे कटू पण तेवढेच सत्य होते. आमच्या पूर्वजांनी शेत-शिवारे, झरे-वझरे, रान-वने जीवाच्या आकांताने जपून ठेवली. स्वतः एक घास कमी खाल्ला, पण गुरांवसरांना, जंगली प्राण्यांना महत्त्व दिले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे सण-उत्सव साजरे केले. त्यातील देवत्व त्यांनी नेहमीच पुजले. निसर्गाने, घनदाट जंगलांनी, महाकाय वृक्षांनी, अथांग डोहानी, खळाळणाऱ्या ओहोळांनी, घसघसून उडी मारणाऱ्या धबधब्यांनी, हिंस्त्र श्वापदांनी त्यांना अचंबित केले. वाघाला त्यांनी देव मानले. त्याची जागा ‘वाघापेठ’ सुरक्षित आणि पवित्र ठेवली.

निसर्गाच्या कणाकणाला शब्द-शब्दातून गीतात गुंफले. ते नृत्यातून अभिव्यक्त केले. त्यासाठी माती-शेणाचा गोळा तयार केला. तो त्यांचा रक्षणकर्ता ‘धिल्लो’. दसरा ते दिवाळी अशा कालावधीत त्याला तुळशीसमोर पुजला. घोसाळ्याच्या व इतर रानफुलांनी सजवला... पर्वतरांगांचे नेपथ्य लेऊन शेणाने सारवलेल्या मातीच्या मांडावर मग सुरू झाला न थकता, न थांबता सामूहिक नृत्याचा अभूतपूर्व आविष्कार... आधुनिक सोयी-सुविधांपासून दूर डोंगरकुशीत विसावलेला काजूर गाव... आजही आधुनिक सुखसोयींनी युक्त जगण्यासाठी संघर्ष करतोय खरा...

परंतु जवळ धनदौलत असूनही विकत घेता येत नाही असे एक संचित... जे सदाहरित, सदासतेज, चैतन्यदायी आहे ते या गावाने जतन केलेले आहे. ते म्हणजेच शांत, निरामय, समाधानी जगण्यासाठी हवे असलेले हिरवे श्वास...


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)