डिसेंबरपूर्वी मदतीचे आश्वासन : भात पिकाच्या नुकसानीचा आढावा
साळ येथील शेतात भात पिकाच्या नुकसानीची पाहणी करताना आमदार डॉ. चंद्रकांत शेटये आणि कृषी संचालक संदीप फळदेसाई.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : भाज पीक कापणीला आलेले असतानाच पाऊस पडल्याने साळ, मेणकुरे, मुळगाव, लाटंबार्से, डिचोली भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हीच स्थिती राज्यात सर्वत्र आहे. मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४० हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई व अधिकाऱ्यांसोबत शेतावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आमदारांसोबत कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, उपसंचालक नीलेश नोरोन्हा, डिचोलीचे विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस, साहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ पिसुर्लेकर, डेरिक आफान्सो, साळचे पंच विशाल परब, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटये, माजी सरपंच वासुदेव परब व इतर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. शेटये व कृषी संचालक फळदेसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी दोन वेगवेगळे अर्ज आहेत. कृषी कार्ड असलेल्यांनी शेतात जाऊन आपला फोटो काढून अर्जाला जोडावा. सोबत कृषी कार्ड प्रत जोडावी. कृषी कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनी शेतात जाऊन आपला फोटो काढून जोडावा, तसेच एक चौदाचा उतारा जोडणे आवश्यक आहे. केळी व सुपारी बागायतदारांनाही मदत दिली जाईल, असे कृषी संचालकांनी सांगितले.
साळ, मेणकुरे येथे ३, ४ रोजी अधिकारी
साळ, मेणकुरे मधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ३ व ४ नोव्हेंबर रोजी कृषी खात्याचे अधिकारी पंचायत कार्यालयात किंवा मंदिरात उपलब्ध राहणार आहेत. तेच सर्वांचे अर्ज भरून घेतील, असे आमदार डॉ. शेटये यांनी सांगितले.