साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

बेकायदा रेती उत्खननावरून उगवेत गोळीबार, तर ओशनमॅन स्पर्धेला करंझाळेवासीयांचा विरोध

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st November, 08:26 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : या आठवड्यात सुरू असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. मये, मोरजीसह अनेक भागांना याचा फटका बसला. ओशनमॅन जलतरण स्पर्धेला करंझाळेतील मच्छीमारांचा विरोध, बेकायदा रेती उत्खननावरून उगवेत गोळीबार करण्यात आला. दाऊदचा हस्तक दानिश चिकना गोव्यात एनसीबीच्या जाळ्यात अडकला. याशिवाय अपघात, चोरी अशा घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

पावसाचा भातशेतीला मोठा फटका; मये, मोरजीसह अनेक भागात नुकसान

‘मोंथा’ चक्रीवादळामुळे ऐन कापणीच्या हंगामातच गोव्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मये, मोरजी, हळदोणासह अनेक भागांत जोरदार पावसामुळे भाताची पिके कुजली असून, कापणी केलेल्या गंजींना कोंब फुटले आहेत.

अवैध बांधकामे नियमितीकरणाला म्हापसा कोमुनिदादचा विरोध

कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याबाबत हल्लीच मंजूर झालेल्या दुरूस्तीला विरोध करण्याचा निर्णय म्हापसा कोमुनिदादने घेतला आहे. तसेच या दुरूस्ती कायद्याला न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली जाणार आहे. कोमुनिदाद गावकरांच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.


आंतरराष्ट्रीय ओशनमॅन जलतरण स्पर्धेला करंझाळेतील मच्छीमारांचा विरोध

करंझाळे समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या ओशनमॅन या खासगी कार्यक्रमाच्या आयोजनास स्थानिक मच्छीमारांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने स्पर्धा अचानक थांबवावी लागली. स्थानिक मच्छीमारांच्या गटाने स्पर्धेला विरोध करत आयोजकांनी आवश्यक परवानग्या न घेतल्याचा आरोप केला.

पणजी पोलीस स्टेशनबाहेर मारामारी; दोन गटांतील सात जणांना अटक

पूर्ववैमनस्यामुळे झालेल्या भांडणानंतर रामनगर- बेती आणि इंदिरानगर- चिंबल या दोन गटाचे सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी पणजी पोलीस स्थानकात आले. मात्र, पोलीस स्थानकाच्या बाहेर दोन्ही गटांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि एकास गंभीर मारहाण झाली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे.

सोमवार

नुवेमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड, स्थानिकांकडून तक्रार

नुवे येथील पाट्याभाट परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड व सपाटीकरण होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तक्रार दाखल केली.

रेल्वे प्रवासात २.८१ लाखांचा ऐवज चोरीला

रेल्वे प्रवासादरम्यान ३५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम मिळून एकूण २.८१ लाखांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी नवे वाडे येथील गुलाम अहमद रझा मुल्ला यांनी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

रस्ता ओलांडताना कारची धडक, बसून फातोर्डा येथे एकाचा मृत्यू

फातोर्डा येथे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारची धडक बसल्याने प्रवीण सावंत (४८, रा. वेर्णा) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


गुगल लोकेशनचा अंदाज चुकल्याने जीप गेली नदीत

‘गुगल मॅप’वरील लोकेशनचा अंदाज चुकल्यामुळे खोर्जुवे, हळदोणा येथील फेरी धक्क्यावरून एक जीप थेट मांडवी नदीच्या पात्रात गेल्याची घटना घडली. सुदैवाने, चालक अमनदीप सिंग मुल्तानी (रा. मयडे, मूळ चंदीगढ) हा युवक जीपमधून बाहेर पडला आणि नदीतून पोहून बाहेर आल्याने बचावला.

मंगळवार

‘ईडी’चा अधिकारी असल्याचे भासवून सासष्टीतील ज्येष्ठाला २.८ कोटींना लुबाडले

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून तसेच आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग केल्याचे सांगून, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सासष्टी तालुक्यातील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


बेकायदा रेती काढणाऱ्यावर उगवेत गोळीबार

पेडणे तालुक्यातील पोरस्कडे-उगवेच्या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या रामरिशी रामराज पासवान आणि लाल बहादूर गोड या दोन कामगारांवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विनापरवाना ओशनमॅन इव्हेंटचे आयोजन भोवले

पर्यटन खात्याकडून मान्यता न घेताच करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय ओशनमॅन इव्हेंटचे आयोजन केल्याबद्दल पर्यटन खात्याने मुंबईतील आयोजक कपिल अरोरा यांना ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच कामात हलगर्जीपणा केल्याने करंझाळे किनाऱ्यावरील पर्यटन वॉर्डनलाही निलंबित करण्यात आले आहे.

बुधवार


प्रसिद्ध बासरी, संतूर वादक नरेश मडगावकर यांचे निधन

गोव्यातील प्रसिद्ध बासरी आणि संतूर वादक नरेश मडगावकर (५१ वर्षे) यांचे मडगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने गोव्यातील संगीत, कला क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले असून उमदा कलाकार मुकल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.


दाऊदचा हस्तक दानिश चिकना गोव्यात एनसीबीच्या जाळ्यात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या अंमली पदार्थ नेटवर्कवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठी कारवाई केली आहे. दाऊदचा अत्यंत विश्वासू आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार दानिश चिकना ऊर्फ दानिश मर्चंट ऊर्फ फँटम याला एनसीबीच्या मुंबई पथकाने गोव्यातील हडफडे येथून अटक केली आहे.

गुरुवार

म्हापसा, दोनापावला दरोड्यांची रेकी करणाऱ्याला अटक

दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर दरोडा आणि म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोडा घालण्यासाठी रेकी करणारा आणि दरोडेखोरांच्या टोळीला मदत करणारा संशयित माहम्मूद अली (४६, रा. कळंगुट, मूळ रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) याला पणजी पोलिसांनी अटक केली. संशयिताला पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार; कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंद झाली आहे. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तिसवाडी तालुक्यातील २४ वर्षीय युवतीने तक्रार दिली आहे.

दोन रेती व्यावसायिकांसह पाच कामगारांना अटक

पोरस्कडे न्हयबाग येथे तेरेखोल नदीमध्ये रेती व्यवसायातील वादातून दोन कामगारांवर गोळीबार केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहे. पेडणे पोलिसांनी रेती व्यवसायाशी संबंधित असलेले रॉबर्ट फर्नांडिस व अशोक मुळगावकर हे स्थानिक व्यावसायिक व पाच मजूर, अशा एकूण सात जणांना अटक केली. घटनेला दोन दिवस उलटले तरी गोळीबार प्रकरणाचा गुंथा सोडवण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

शुक्रवार

फिडे विश्वचषकाचे थाटात उद्घाटन

मागील काही वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पुढील काही वर्षांत भारत जागतिक क्रीडा हब बनेल, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. शुक्रवारी पणजीत फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

‘ओला’ ई-वाहनांच्या विक्रीस गोव्यात वाहतूक खात्याकडून तात्पुरती बंदी

वाहतूक खात्याने ‘ओला’ इलेक्ट्रिक वाहनात कंपनीचे ट्रेड सर्टिफिकेट (टीसी) आणि ऑनलाइन नोंदणी तात्पुरती स्थगित केली आहे. स्थगिती उठेपर्यंत कंपनीला गोव्यात नवीन वाहनांची विक्री करता येणार नाही. ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यावर स्थगिती उठवण्यात येणार आहे, असे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शनिवार

रेंट अ कॅब चोरल्याच्या संशयावरून खून

पिर्ण, बार्देश येथील कपिल चौधरी (१९) या युवकाच्या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी रेंट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे (३१, कांदोळी, बार्देश) याला अटक केली आहे. कपिलने भाड्याने घेतलेली थार जीप गोव्याबाहेर नेली होती. जीप चोरल्याच्या संशयावरून त्याला लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून ठार मारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

विक्रेत्याची रक्कम चोरल्याने एकास अटक

सुकूर येथे मटण- चिकन विक्रेत्याची १ लाख रूपये रोकड लुबाडणूक प्रकरणी पुण्यातील इराणी टोळीतील मुक्तार सय्यद (३४) याला पर्वरी पोलिसांकडून अटक करण्यात आली.

लक्षवेधी

एडबर्ड परेरा याला झालेल्या मारहाणीवर गुन्हा दाखल करून खास तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने पोलीस महासंचालकांकडे केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालक अलोक कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

डिचोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गेल्या काही दिवसांत रौद्ररूप धारण केले. यामुळे डिचोलीतील वाळवंटी आणि पार नद्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि जलस्रोत खात्याची धावपळ उडाली. अंजुणे धरणाची पाणी पातळी ९३ मीटरच्या वर वाढल्यामुळे धरणाचे चारही दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ आणि इतर सात जणांच्या कोठडीत मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने वाढ केली आहे. जेनिटोसह आठही संशयितांना १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी दिला.

निंगप्पा लमाणी यांच्या तक्रारीवरून काणकोण पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलाला कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय धोकादायक वेल्डिंगच्या कामासाठी लावण्यात आले होते. हे काम करत असताना मुलाला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा