जैतीर-उगवे गोळीबार प्रकरण : दोघा पोलिसांसह पाच जणांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
जैतीर-उगवे गोळीबार प्रकरण : दोघा पोलिसांसह पाच जणांना अटक

पेडणे तालुक्यातील जैतीर-उगवे येथे बेकायदा रेती (वाळू) उत्खननाच्या (Illigal Sand Mining) वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पेडणे पोलिसांनी आज रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मोठी कारवाई केली. या प्रकरणात 'मॅगी गँग'शी (Maggi Gang) संबंधित दोन आयआरबी (Goa Police-IRB) पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच स्थानिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या गोळीबारात रेती उपसा करणारे रामरिशी रामराज पासवान (Ramrishi paswan) आणि लाल बहादूर गोड (lalbahadur gaud) हे दोन बिहारी कामगार गंभीर जखमी झाले होते.


Seven Arrested for Illegal Sand Extraction in Pernem; Probe into Gunshot  Incident Continues - Goemkarponn - Goa News


अटक झालेले संशयित 

चार दिवसांत कसून चौकशी केल्यानंतर पेडणे पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास उगवे, पेडणे येथील पाच आरोपींना शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act) अटक केली.नेहाल महाले (Nehal Mahale) (२०), आशिष महाले (Ashish Mahale) (२४), आकाश महाले (Akash Mahale) (२४), ऋषिकेश महाले (Rhishikesh Mahale) (३२), गंगाराम महाले (Gangaram Mahale) (३४)(सर्वजण उगवे) यातील ऋषिकेश महाले हा आयआरबी पोलीस कर्मचारी (Constable @  Indian Reserve Battalion-IRBn) आहे तर गंगाराम महाले हा एटीएसचा (Anti Terrorist Squad) कॉन्स्टेबल आहे. 

नेमके प्रकरण काय ?

मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी उत्तररात्री २.३० वाजता पोरसकडे-उगवेच्या सीमारेषेवर असलेल्या तेरेखोल नदीकिनारी गोळीबाराची (Shootout) ही धक्कादायक घटना घडली. रेती व्यवसायाशी संबंधित असलेला आठ जणांचा एक गट रेती काढण्यासाठी होडीतून जात असताना दुसऱ्या गटाने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेले दोन्ही कामगार गंभीर असून, त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात उपचार सुरू आहेत. एका कामगाराच्या हातातून तर दुसऱ्याच्या मानेतून गोळी आरपार गेली होती. 

गोळीबारामागील कारण

प्राथमिक तपासातून हा हल्ला रेती व्यवसायातील स्थानिक स्पर्धेतून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोरसकडे-उगवे भागात रेती व्यवसायात मोठी स्पर्धा वाढली आहे. रात्रीच्या वेळी एकमेकांच्या हद्दीत घुसून रेती उपसा केला जात असल्याने अनेकदा वादविवाद आणि मारामारीच्या घटना घडत होत्या. २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील परिसरात रेती व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादामधूनच दुसऱ्या दिवशीच्या हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.


Following murder, Goa CM instructs strict vigil on illegal sand mining -  Daijiworld.com


पोलीस तपास आणि पुढील कारवाई

गोळीबारानंतर पेडणे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोळीबार झाल्यामुळे पेडणे पोलिसांनी ज्या स्थानिक व्यक्तींकडे शासकीय परवाना असलेली बंदूक आहे, अशा एकूण ४९ जणांना पोलीस स्थानकावर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी अखेर चार दिवसांच्या सखोल चौकशीनंतर स्थानिक पाच जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणात चक्क आयआरबी पोलिसांचा सहभाग आढळून आल्याने पेडणे भागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर रेती व्यवसायाशी संबंधित मजुरांची नोंदणी पोलिसांकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा करण्यावर बंदी असतानाही, फिरत्या पथकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


Illegal Sand Mining #StartUp at DHARGAL PERNEM Goa | BJP govt 100 days  achievement | #saveGoa - YouTube

हेही वाचा