पिर्ण खून : तिघा संशयितांना ८ दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
पिर्ण खून : तिघा संशयितांना ८ दिवसांची पोलीस कोठडी

पणजी : पिर्ण, बार्देश येथील कपिल चौधरी या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांचा पोलीस रिमांड दिला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी गुरुदत्त लवंदे (कांदोळी), डायसन डोमिंगोस कुतिन्हो (कळंगुट) आणि सूरज जोतीश ठाकूर (कांदोळी) या तिघांना शनिवारीच अटक केली होती.
मूळ उत्तर प्रदेश येथील कपिल चौधरी हा शुक्रवारी पिर्ण आणि खरगाळी दरम्यानच्या टेकडीवर गंभीर अवस्थेत पडलेला सापडला. १०८ रुग्णवाहिकेने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीरावर दांडा तसेच लाथांच्या जखमांचे वण होते. मारहाणीतून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय येताच पोलिसांनी कॉल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाचा छडा लावला. शनिवारी सकाळी रेन्ट अ कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता डायसन कुतिन्हो व सूरज ठाकूर या दोघां संशयितांची माहिती पोलिसाना मिळाली. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी या दोघांना अटक केली. या खून प्रकरणात आणखी संशयित गुंतले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कपिल चौधरी याने ३० ऑक्टोबर रोजी गुरुदत्त याच्याकडून रेन्ट अ कॅब असलेली थार जीपगाडी भाड्याने घेतली. दीपक ठाकूर या नावाने असलेले पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून त्याने दिले होते. ही जीपगाडी बांदा-सावंतवाडी येथे पोचल्याचे जीपीएस ट्रॅकरद्वारे गुरुदत्तने मित्रांसोबत जीपचा पाठलाग सुरू केला. कुडाळ-कणकवली येथे संशयितांनी जीपगाडी अडवली व त्याला तेथेच मारहाण केली. त्यानंतर पिर्ण येथील टेकडीवर आणून मारहाण केली. या मारहाणीत कपिलचा मृत्यू झाला होता.