बीसीसीआयकडून ५१ कोटी जाहीर : विश्वचषक विजेत्या महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
बीसीसीआयकडून ५१ कोटी जाहीर : विश्वचषक विजेत्या महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव

नवी मुंबई : विश्वचषक जिंकून इतिहास रचलेल्या एकदिवसीय भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) महिला संघाला ५१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. विजेतेपद मिळवलेल्या संघाला आयसीसीकडून ४० कोटी रुपये मिळाले आहेत. 

नवी मुंबई येथे रात्री उशीरापर्यंत चाललेल्या ‘आयसीसी महिला विश्वचषक २०२५’ (ICC Womens World Cup 2025) अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने (Indian Women Cricket Team)  विजय मिळवत चाहत्यांना दिवाळीची भेट दिली होती.

५१ कोटी रुपयांच्या बक्षिसातून खेळाडू, प्रशिक्षक व इतर सहकारी कर्मचारी यांना वाटा मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सायकीया यांनी सांगितले की, महिला संघाने मिळवलेला विजय मोठा असून, भारतीय क्रिकेटची परिभाषा बदलून परिवर्तन घडवून आणणारा आहे.

१९८३ साली कपिल देव यांनी पहिल्यांदा विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट मध्ये नव्या युगाची सुरूवात केली. तोच उत्साह महिला संघाच्या विजयानंतर निर्माण झाला आहे. त्यातून भारतीय क्रिकेटला अजून प्रोत्साहन मिळणार आहे.

हर्मनप्रीत कौर आणि तिच्या संघाने केवळ चषक जिंकलेला नाही तर भारतीयांचे ह्रदयही जिंकले असल्याचे देवजीत यांनी सांगितले. हा विजय  पुढील पिढीला, महिला क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरणार. एक गोड स्मृती म्हणून कायम स्मरणात राहणार.

सायकिया यांनी या विजयाचे श्रेय बीसीसीआयचे माजी सचिव व आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना दिले. त्यांनी लींग भेद मिटवत क्रिकेटमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला.

बीसीसीआयचा ताबा घेतल्यानंतर जय यांनी महिला क्रिकेट मध्ये अनेक परिवर्तन करणारे निर्णय घेतले.

गेल्या महिन्यात आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी महिला खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेतही २.८८ मिलियन अमेरिकन डॉलर वरून १४ मिलियन डॉलर एवढी वाढ केली. त्यामुळे महिला खेळाडूंना अधिक चालना मिळाली.