टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, जेमिमाचे ऐतिहासिक शतक

महिला एकदिवसीय विश्वचषक : ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने धुव्वा

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
9 hours ago
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, जेमिमाचे ऐतिहासिक शतक

नवी मुंबई : जेमिमाह रॉड्रिग्जने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर महिला टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले होते त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, भारतीय महिलांनी इतिहास घडवत कांगारूंचा विजयरथ यशस्वीपणे रोखला.
टीम इंडियाने हे आव्हान ४८.३ षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि फायनलचे तिकीट मिळवले. भारताने यासह गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप केले. तसेच साखळी फेरीतील पराभवाची अचूक परतफेड केली आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.

तिसऱ्या विकेट्ससाठी निर्णायक भागीदारी
भारताच्या या विजयात जेमिमा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या दोघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. तसेच इतरांनीही निर्णायक योगदान दिले. जेमिमा आणि हरमनप्रीत या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी निर्णायक योगदान दिले. तर अखेरच्या क्षणी ऋचा घोष आणि अमनजोतने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रतिका रावलच्या जागी आलेल्या शेफाली वर्माने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, शेफाली १० धावांवर बाद झाली. भारताने १३ धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर जेमिमा आणि स्मृती मानधना या दोघींनी भारताचा डाव सावरला. या दोघींनी काही वेळ स्कोअरकार्ड हलता ठेवला. स्मृतीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र, स्मृतीच्या रूपात भारताने दुसरी विकेट गमावली. त्यामुळे भारताची धावसंख्या २ बाद ५९ अशी झाली होती.
त्यानंतर जेमिमा आणि कॅप्टन हरमनप्रीत या दोघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. जेमिमा आणि हरमनप्रीत या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. जेमी आणि हरमप्रीतने १६७ धावांची पार्टनरशीप केली. हरमनप्रीतला शतकाची संधी होती. मात्र, हरमनप्रीतने ८९ धावा केल्या.
हरमननंतर जेमी आणि दीप्ती शर्मा ही जोडी जमली होती. मात्र, जेमीच्या शतकाच्या घाईगडबडीत दीप्ती शर्मा धावबाद झाली. दीप्तीने २४ धावा केल्या. दीप्तीनंतर मैदानात आलेल्या ऋचा घोष हिने जेमीला अप्रतिम साथ दिली. जेमी आणि ऋचा जोडीने पाचव्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. ऋचा चांगली फटकेबाजी करत होती. मात्र, ऋचा फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाली. ऋचाने १६ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.
त्यानंतर जेमिमाने अमनजोत कौर हिच्यासह १५ चेंडूमध्ये ३१ धावांची नॉट आऊट पार्टनरशीप करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. जेमिमाने नॉट आऊट १२७ धावा केल्या. जेमीने या खेळीत १४ चौकार लगावले. अमनजोतने नाबाद १५ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांची धुलाई
तत्पूर्वी महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने कर्णधार एलिसा हीली (५ धावा) आणि फोबी लिचफिल्डची जोडी २५ धावांवर फोडली. मात्र, त्यानंतर फोबी लिचफिल्ड आणि एलिसा पेरी या जोडीने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या जवळ नेले.
फोबीची धडाकेबाज शतकी खेळी
या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंमध्ये १५५ धावांची दीडशतकी भागीदारी केली. यावेळी फोबी लिचफिल्डने खणखणीत शतक झळकावले. १८० धावा असताना अमनजोत कौरने फोबीला बाद केले. फोबीने ९३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १७ चौकारांसह ११९ धावांची धडाकेबाज खेळी केली.
भारताचे शानदार कमबॅक
फोबी बाद झाल्यानंतर एलिसा पेरी आणि बेथ मुनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या, पण बेथ मुनी (२४ धावा) आऊट होताच भारताने सामन्यात कमबॅक केले. भारताने केवळ ४५ धावांच्या मोबदल्यात ४ महत्त्वाचे झटके दिले. अनाबेल सदरलँड (३), एलिसा पेरी (७७) आणि ताहिला मॅग्राथ (१२) लवकर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद २२० वरून ६ बाद २६५ अशी झाली. त्यानंतर किमा गार्थ आणि एश्ले गार्डनर (६३ धावा) या जोडीने सातव्या विकेटसाठी ६६ धावा जोडून संघाला ३३० पार नेले.
भारतीय गोलंदाजीची कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा डाव अखेर ३३८ धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा आणि श्री चरणी या दोघींनी सर्वाधिक प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
भारताची विश्वचषकातील सर्वोच्च भागीदारी
एकदिवसीय विश्वचषकातील पुरुष किंवा महिलांच्या नॉकआउटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंझार खेळी केली. दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर मैदानात उतरली होती. तिने जेमिमा रॉड्रिग्ससोबत १६७ धावांची भागीदारी केली. ही भारताची विश्वचषकातील कोणत्याही बाद फेरीतील सर्वोच्च भागीदारी होती. तसेच विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च भागीदारी होती. हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार मारत ८९ धावांची खेळी केली.
महिला विश्वचषक नॉकआउटमध्ये ३०० हून अधिक धावसंख्या
३५६/५ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड क्राइस्टचर्च २०२२ (फायनल)
३३८ ऑस्ट्रेलिया वि. भारत मुंबई डीवायपी २०२५ (सेमीफायनल)
३१९/७ दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड गुवाहाटी २०२५ (सेमीफायनल)
३०५/३ ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज वेलिंग्टन २०२२ (सेमीफायनल)