वर्चस्ववादातून गुंडाराज उदयास

पेडणे : उच्च न्यायालयाच्या (high court of Bombya in Goa) आदेशानुसार तसेच हरित लवादाच्या (green tribunal) निर्देशांनुसार राज्यात (Goa) रेती उपशास (sand mining) बंदी आहे. तेरेखोल आणि शापोरा या नदीतही रेती उपसा करण्यास निर्बंध घातले आहेत. या कुठेही रेती व्यवसाय सुरू असेल, तर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सध्या पेडणे (Pernem) तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्यांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उपसा चालू आहे. मंगळवारी उत्तररात्री रेती उपशातील वर्चस्ववादातून गोळीबार झाल्यामुळे बेकायदा रेती उपसा सुरू असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. मात्र यामुळे तेरेखोल नदीपात्र दिवसेंदिवस रुंदावत असून निसर्गसंपदेची मोठ्या प्रमाणात हानी हाेत आहे.
बेकायदेशीर रेती उपशाला सरकारी यंत्रणेचाही आशीर्वाद असल्याचे या भागातील स्थानिक सांगतात. त्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होतात. रेती उपसा रात्री गुपचूप करून पहाटेपर्यंत तो भाग मोकळा करून रेती अन्यत्र हलविली जाते. हे सर्व पोलिसांना आणि भरारी पथकाला का दिसत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.
पुलांना धोका...
पेडणे तालुक्यातील दोन्ही नद्यांवर धारगळ, कोलवाळ, रेल्वे पूल, तर्मास, हळर्ण, वजरी, पीर्ण, किरणपाणी-आरोंदा असे अनेक पूल आहेत. शिवाय न्हयबाग ते तोरसेपर्यंत राष्ट्रीय रस्ता याच नदीलगतच्या भागातून जातो. पाच वर्षांपूर्वी पोरस्कडे येथील रेल्वे पुलाच्या जवळचा शंभर मीटरचा रस्ता संरक्षक भिंतीसह तेरेखोल नदीत वाहून गेला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे. तर्मास पुलालाही धोका आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
२०१० मध्ये गोळीबाराची घटना
- यापूर्वी २०१० मध्ये महाखाजन येथे शापोरा नदीतील उत्खननामुळे आपल्या घर व बागायतीला धोका उत्पन्न झाला असून रेती काढू नये, अशी मजुरांना विनंती करूनही ते ऐकत नसल्याने मजुरांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात एक मजूर जखमी झाला होता. या प्रकरणी महिलेस अटक झाली होती.
- तेरेखोल नदीजवळ आपल्या बागायतीची जमीन कोसळत असल्यामुळे कवठणी-सिंधुदुर्ग येथील एका शेतकऱ्याने होडीतून येऊन रेती कामगारांवर हल्ला केला होता. त्यात एक मजुराचा नदीत पडून मृत्यू झाला होता. तीन महिन्यांपूर्वी असाच एक मजूर उगवे या ठिकाणी नदीत वाळू काढत असताना पडल्याची चर्चा होती. परंतु त्याची नोंद कुठेही झाली नाही.
- मध्यंतरी उगवेवासीयांनी रेती व्यवसायाला तीव्र विरोध केला होता. पोरस्कडे-न्हयबाग येथील काही रेती व्यावसायिकांनी विरोध करणाऱ्यांना बेदम मारहाण करून अपहरण करण्याचाही प्रकार घडला होता. त्यावेळी आंदोलन झाले होते, गुन्हे नोंद केले होते, पेडणे पोलीस स्टेशनवर मोर्चाही नेला होता.
सीसीटीव्ही, पेट्रोलिंग बोटी कशासाठी?
हरित लवादाने खाण आणि भूगर्भ खात्याला या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. संबंधित खात्याने सीसीटीव्ही बसवल्याचे सांगितले होते. ते कॅमेरे चालू आहेत की बंद आहेत? चालू असतील तर कारवाई का हाेत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. रेती उपसा करायला बंदी असूनही शापोरा नदीत रात्रीच्या वेळी दाटीवाटीने होड्या दिसून येतात. यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने किनारी पोलिसांना कोट्यवधी रुपये खर्च करून बोटी दिल्या. मात्र त्याचा फायदा झालेला नाही.
किनाऱ्यांची धूप
या अमर्याद रेती उपशामुळे नदी किनाऱ्याची धूप झाली असून परिसरातील शेती-बागायतींची स्थिती बिकट बनली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी शापोरा आणि तेरेखोल नदीकिनारी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. नदी किनारी भागातील माड जलसमाधी घेत आहेत. भविष्यात पोरस्कडे नदीवरील रेल्वे पूल धोक्यात येऊ शकतो. ही हानी वाचवण्यासाठी भूगर्भ खाते, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.