माशे, काणकोण येथे दुचाकीची भटक्या गुरांना धडक; कारवारच्या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृत्यू

सहविद्यार्थी जखमी; भटक्या गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
माशे, काणकोण येथे दुचाकीची भटक्या गुरांना धडक; कारवारच्या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृत्यू

जोयडा: माशे, काणकोण परिसरात मंगळवारी रात्री  रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या भटक्या गुरांना दुचाकीची धडकल्याने एक भीषण अपघात (MAJOR ACCIDENT )झाला. यात कारवार येथील कारवार मेडिकल कॉलेजचा (KRIMS) तिसऱ्या वर्षाचा एमबीबीएस विद्यार्थी आदर्श पुजारी (ADARSH PUJARI)  (वय २३, रा. गोकाक, जि. बेळगावी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत प्रवास करणारा रौनक चापला हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर रात्रीच्यावेळी प्रामुख्याने जाणवणारी रस्त्यावरील भटक्या गुरांची गंभीर समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली.  

नेमकी दुर्घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श पुजारी आणि रौनक चापला मोटारसायकलवरून काणकोणकडून कारवारकडे परत येत होते. रात्री जेवणासाठी हे दोघे काणकोणात थांबले होते. माशेजवळ अचानक रस्त्यावर एक बैल (STRAY CATTLE) आल्याने त्यांनी मोटारसायकलवरील नियंत्रण गमावले आणि अपघात झाला.

स्थानिकांनी तातडीने दोघांनाही काणकोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (CHC) हलवले, मात्र डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केले. आदर्शचे 'डॉक्टर' होण्याचे स्वप्न या अपघातामुळे अपूर्ण राहिले. सध्या त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदनानंतर कारवारच्या 'क्रिम्‍स' रुग्णालयात पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. रौनकवर उपचार सुरू आहेत.

कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर कॉलेज विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'क्रिम्‍स' प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत असल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात येत असल्याची टीका पालक आणि विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी क्रिम्‍स प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा प्रोटोकॉल, विद्यार्थ्यांच्या प्रवासावर वेळेची मर्यादा आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे. याआधीही अशा प्रकारचे अपघात घडले असल्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे.

भटक्या गुरांची समस्या

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, माशे–काणकोण मार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोकाट गुरे मोठ्या संख्येने भटकत असतात. रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसणे आणि पशू नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने असे अपघात वाढले आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. आदर्शच्या मृत्यूने 'क्रिम्‍स' कॅम्पसमध्ये शोककळा पसरली असून, सहकारी त्याला 'प्रामाणिक, मदत करणारा आणि अभ्यासू मित्र' म्हणून आठवत आहेत. एका विद्यार्थ्याने ही घटना विद्यार्थी सुरक्षा आणि प्रशासकीय जबाबदारीबाबत गंभीर इशारा देऊन गेली असल्याचे मत व्यक्त केले आहे.


हेही वाचा