
दुबई: आई आणि मुलाच्या नात्याची महती सांगणारी एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. आपल्या आईच्या निस्वार्थी प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्या जन्मतारखेची बेरीज करून आलेला ११ हा अंक निवडून केरळच्या एका २९ वर्षीय तरुणाने लॉटरी तिकीट खरेदी केली आणि त्यांचे नशीब रातोरात पालटले. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये कामानिमित्त वास्तव्य करणाऱ्या अनिलकुमार बोल्ला (Anilkumar Bolla) या तरुणाने तब्बल १०० दशलक्ष दिऱ्हम (भारतीय चलनानुसार सुमारे २४० कोटी रुपये) इतका भव्य 'जॅकपॉट' जिंकून नवा विक्रम केला आहे.
११ हा अंक ठरला लकी नंबर
अनिलकुमार बोल्ला हा गेल्या काही वर्षांपासून अबू धाबीमध्ये राहतो. त्याने १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या 'लकी डे ड्रॉ'मध्ये १२ तिकिटे खरेदी केली होती. लॉटरीचे विजयी तिकीट निवडताना त्याने 'इझी पिक' पर्यायाचा वापर केला आणि शेवटचा अंक म्हणून ११ हा खास अंक निवडला. कारण ११ ही त्याच्या आईची जन्मतारीख होती. जेव्हा लकी ड्रॉ घोषित झाला, तेव्हा त्याचे सर्व सात अंक जुळले आणि तो रातोरात अब्जाधीश बनला.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये, दुबईमध्ये राहणाऱ्या संदीप कुमार प्रसाद नावाच्या दुसऱ्या एका भारतीयाने अबू धाबी बिग टिकेट सिरीज २७८ ड्रॉमध्ये १५ दशलक्ष दिऱ्हमचे (सुमारे ३५ कोटी रुपये) ग्रँड बक्षीस जिंकले होते.

'होय, मी जिंकलो!'
बोल्ला घरी आराम करत असताना त्याला यूएई लॉटरी टीमचा फोन आला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तब्बल २४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्याची बातमी ऐकून त्याला सुरुवातीला सुखद धक्का बसला. या घटनेनंतर यूएई लॉटरीने समाज माध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अनिलकुमार म्हणाला, मला धक्का बसला होता. मी सोफ्यावर बसलो होतो आणि मला फक्त आतून जाणवत होते की, हो, मी जिंकलो आहे!.

पालकांची स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा
एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अनिलकुमारने पैशांचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याची योजना आखली आहे. त्याने सांगितले की, ही रक्कम तो सर्वप्रथम आपल्या पालकांची छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. "मला फक्त माझ्या कुटुंबाला यूएईमध्ये घेऊन यायचे आहे आणि त्यांच्यासोबत राहून माझ्या संपूर्ण आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. माझ्या आई-वडिलांची स्वप्ने खूप लहान आहेत आणि मला त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत," अशी भावनिक इच्छा त्याने व्यक्त केली.
गरजू लोकांना मदत करण्याचा मानस
वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त बोल्ला याने बक्षिसातील काही रक्कम धर्मादाय संस्थांना (Charitable Organizations) दान करण्याची योजना आखली आहे. ही रक्कम खऱ्या गरजू लोकांना मिळावी, जेणेकरून त्याला खरा आनंद मिळेल, असे त्याने स्पष्ट केले.