पुण्यात अल-कायदाच्या हस्तकाला अटक

एटीएसची मोठी कारवाई : आयटी क्षेत्रात होता कार्यरत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th October, 09:25 pm
पुण्यात अल-कायदाच्या हस्तकाला अटक

पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा परिसरातून एका आयटी इंजिनिअरला अटक केली. या व्यक्तीचे अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव झुबेर हंगरगेकर असे असून, तो गेल्या अनेक वर्षांपासून कोंढवा परिसरात वास्तव्यास होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हंगरगेकर हा सॉफ्टवेअर क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यावसायिक असून, सध्या तो कल्याणीनगरमधील एका नामांकित आयटी कंपनीत सिनीअर क्यूए विश्लेषक म्हणून कार्यरत होता.
हंगरगेकर हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा असून, गेल्या १५ वर्षांपासून पुण्यातील विविध मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये काम करत होता. त्याचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांमध्ये असल्याचे समजते.
महाराष्ट्र एटीएस ने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे कोंढव्यात छापा टाकला. या कारवाईत झुबेर हंगरगेकरला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध यूएपीए (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान संशयिताच्या घराची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये काही डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन, हार्ड डिस्क, आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व सामग्री पुढील तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, झुबेरवर अनेक दिवसांपासून एटीएस सतत लक्ष ठेवून होती. त्याच्या ऑनलाईन संवादांमधून आणि आर्थिक व्यवहारांमधून काही संशयास्पद हालचाली समोर आल्या होत्या. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
अटक झालेल्या झुबेर हंगरगेकरची सखोल चौकशी सुरू असून त्याच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींबाबतही तपास चालू आहे. एटीएसच्या सायबर सेल आणि केंद्रीय गुप्तचर संस्था (आयबी) यांचाही या तपासात सहभाग आहे.
अल-कायदाशी थेट संबंध, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य कटाची दिशा याबाबत सर्व कोन तपासले जात आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या प्राथमिक पुरावे महत्त्वाचे असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक धागेदोरे स्पष्ट होतील.

 

पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ

उच्चशिक्षित आणि मोठ्या पगारावर काम करणारा व्यावसायिकाला दहशतवादाच्या संशयाखाली अटक झाल्याने पुण्यातील आयटी क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्थानिकांना अफवा पसरवू नये आणि चौकशीस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

हेही वाचा