
गोव्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीसाठी पिस्तूल व बंदुकीचा वापर करण्याचे प्रकार खुलेआम घडत आहेत. मडकई नंतर मुंगूल, नेसाय व आता पेडणे तालुक्यातील जैतीर-उगवे येथे गोळीबाराची घटना घडली. तेरेखोल नदीत वाळू उपसा करणार्या कामगारांवर गोळीबार करण्यात आला. यात दोन कामगार जखमी झाले. हा हल्ला रेती व्यवसायातील वादातून माफियांकडून घडला की इतर कोणत्या कारणांमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मात्र, मागील काही महिन्यांतील गुन्हेगारी कृत्यांचा आढावा घेतला तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पोलीस यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. मारामारी आणि जाळपोळीचे प्रकार तर पोलीस स्थानकांच्या परिसरातही होत आहेत. गोळीबाराचा सर्रासपणे वापर होणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढल्यासारखे आहे. त्यामुळे राज्यात खाकी वर्दीचा धाक कमी होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
सध्या गोवा पोलीस यंत्रणा ही सुशेगाद बनली आहे. गुन्हेगारी कारवाया लपवून जनतेला वातावरण सुरक्षित असल्याचे भासवण्याची बनावट पद्धत पोलीस अधिकार्यांनी अवलंबली आहे. प्रतिष्ठित कुटुंब, उच्चभ्रू वसाहती आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांवरही दरोडा - चोरीचे प्रकार घडले जात आहे. या गुन्ह्यांचा छडा लागत नाहीत. हरमलमध्ये चालणारा मिनी बायणाचा बाजार असो, पणजीतील हप्ते गोळा करणे किंवा किनारपट्टीवर चालणारी लुटमारी आणि अवैध धंद्यांना खाकीचाच आशीर्वाद मिळत आहे, असे दिसून येते.
पोलीस खात्यात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी आहेत. मात्र दुषित यंत्रणेत त्यांनाही वाहून जावे लागत आहे. सरकारी सर्वच खात्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. परंतु भ्रष्टाचाराची चर्चाही पोलिसांच्या बाबतीत होते, कारण जनतेच्या रक्षणाचे ते सेवक आहेत. बदली आणि ड्यूटीसाठीही पैसे मोजणे हे पोलिसांच्या खच्चीकरणाचे प्रमुख कारण मानले जाते. अधिकार्यांची मर्जी मग ती कोणत्याही प्रकारची असो, पाळायलाच हवी. त्यातून कनिष्ठ हेच पोलीस स्थानकाचे प्रमुख बनले आहेत, अशी प्रथा सध्या पोलीस खात्यात रुजली आहे.
शिवाय पोलीस अधिकार्यांत आयपीएस आणि स्थानिक अशी दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रमाणिकपणे सेवा बजावण्यात कुणालाही रस नाही. त्यातून पिस्तूल तस्करी आणि कोणत्याच गोष्टीवर अंकुश नसल्याने आणि वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यात गुन्हेगारी कारवायांना उत्तेजन मिळत आहे, असे दिसून येते.
- उमेश झर्मेकर