धारबांदोडा तालुक्यातील देवराया

देवरायांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आज आपण नियोजनबद्ध प्रयत्न केले तरच हा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा टिकेल आणि आमचे जगणेही सुंदर आणि समृद्ध होईल.

Story: विचारचक्र |
28th October, 09:39 pm
धारबांदोडा तालुक्यातील देवराया

घारबांदोडा तालुक्यातील बहुतांश गावांत जगल रक्षणाची परंपरा असल्याने तेथील आदिवासी आणि जंगलनिवासी जनतेने महावृक्ष, महाकाय वेलींनी समृद्ध जंगले राखून ठेवली. लोह खनिज व्यवसाय सुरू होण्यापूर्वी इथल्या कष्टकरी लोकसमूहांनी देवाधर्माच्या नावांनी देवराया श्रद्धेने राखून ठेवल्या. आज त्यातल्या बहुतांश सुरक्षित देववनांचा आणि सरकारी राखीव जंगलांचा समावेश सुमारे २४० चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात केल्याने त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण झालेले आहे. आज घारबांदोडातील धारगे, बोडट्टर, तयडे, केरी, बोरयाळे, म्हातकणसारख्या बाराभूमींच्या प्रदेशात देवदेवतांच्या एकापेक्षा एक सुंदर मूर्तींचे दर्शन अशा सुरक्षित जंगल क्षेत्रात पाहायला मिळते. तांबडी सुर्लच्या ऐतिहासिक गोवा कदंबाशी निगडित महादेव मंदिराकडे जाताना डावीकडे जाणारा रस्ता तयडेत जातो. तयडेत ब्राह्मणीची राय असून या देवराईत गोव्यातील ज्ञात सगळ्यात मोठ्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती पाहायला मिळतात. ऊन, पाऊस, वारा यांचा मारा झेलत उघड्यावर असलेल्या या मूर्ती आज भग्नावस्थेत पोहचलेल्या आहेत. या देवराईत ब्राह्मणी मायेचे शेकडो वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणारे आणि शिल्पकलेतील लोकशैलींचा वापर करून कोरलेल्या चित्रविचित्र प्राण्यांची शस्त्रसज्ज घोडेस्वारांची, स्त्री-पुरुषांच्या समागमाची चित्रे मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या पाषाणावर पाहायला मिळतात.

मंदिरांवर असेलली ही चित्रे जुन्या काळच्या सांस्कृतिक, सामाजिक विश्वाचे दर्शन घडवणारी आहेत. या मंदिराच्या पायऱ्यांच्या दुतर्फा आरती घेतलेल्या स्त्रिया पंचमुखी हनुमानाशी साधर्म्य सांगणाऱ्या देवाच्या कोरीव मूर्तीच्या चित्रांचे दर्शन घडते. महिषासुरमर्दिनी, गजलक्ष्मी, ब्राह्मणी आदींच्या मूर्ती वैभवात येथे असलेली गजारूढ इंद्राणीसारखी लक्षवेधक मूर्तीचे दर्शन घडते.

जर्मन विदुषी ग्रित्तली मित्तलवालनर यांनी तीन दशकांपूर्वी जेव्हा ब्राह्मणी मायेच्या तयडेतल्या देवराईला भेट दिली होती, तेव्हा तिथल्या पुरातत्वीय संचितांचे दर्शन त्यांच्या चित्तवृत्तींना दिपवून टाकणारे ठरले होते. साकोर्डाला जाण्याच्या वाटेवर डाव्या बाजूला खाचकोण येथे जी देवराई आहे, ती जशी वृक्षवेलींनी समृद्ध आहे तशीच ती पुरातत्वीय मूर्ती वैभवाने श्रीमंत आहे. गोव्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बऱ्याच गावांतील देवरायात तिथल्या भाविकांनी मूर्तिभंजक आक्रमकांच्या विध्वंसापासून मूर्तींचे रक्षण करण्याच्या हेतूने देवदेवतांच्या मूर्तींना तिथे ठेवले होते. आज नव्या मंदिरांत देवरायांतून मूर्ती आणून त्याच स्थलांतर करणे म्हणजे अधिष्ठात्र्या देवाच्या प्रकोपाला निमंत्रित करण्यासारखे वाटते आणि त्यासाठी स्वराज्यात त्यांनी या मूर्ती तिथून हलवलेल्या नाहीत. इथल्या बऱ्याच गावातील गावकऱ्यांनी जेव्हा सातेरी-केळबायच्या मंदिराची उभारणी केली, तेव्हा त्यांनी धार्मिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करून देवराईत असलेल्या बहुतांश मूर्ती गावातील काही नव्याने बांधलेल्या मंदिरात आणून त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यामुळे त्यातल्या काही मूर्तीतील पुरातत्वीय, सांस्कृतिक, धार्मिक संचितांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पैलूंचा अभ्यास करणे शक्य झालेले आहे. वाघोण येथे पूर्वापार कष्टकरी गावकऱ्यांचे वास्तव्य असून, एकेकाळी सत्तरीतील गावांतून त्यांनी स्थलांतर केलेले असून, इथे आल्यावर त्यांना ज्या परंपरा आणि लोकसंचिते पहायला मिळाली, त्यांचे त्यांनी संवर्धन आणि संरक्षण केलेले आहे. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंनी युक्त वाघोणची देवराई आज इथे सौंदर्यीकरणाच्या बेशिस्त वावटळीत संकटग्रस्त झालेली आहे. परंतु असे असताना इथे देवराईत उभे असलेले शतकोत्तर इतिहासाच्या परंपरांचे साक्षीदार असणारे महावृक्ष त्याची शान ठरलेली आहे.

देवरायांच्या परंपरेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे यांनी देवराईसंदर्भातली आपली भूमिका नमूद केलेली आहे. त्या म्हणतात, माणूस भटकेपणा सोडून पशुपालन आणि शेतीकडे वळला, त्या काळात 'देवराई' या संकल्पनेचा उगम झाला. त्या काळातील द्रष्ट्या लोकांनी या परंपरेची रुजुवात केली, तीही ही परंपरा पुढे हजारो वर्षे टिकली पाहिजे, याचा विचार करून आणि त्या काळातील सामान्य जनतेला रुचेल, पटेल अशा प्रकारे! आश्चर्याची बाब अशी, की खरेच आजच्या विज्ञाननिष्ठ समाजातही धार्मिक श्रद्धेवर आधारित, लोकसहभाग असलेली देवराईची परंपरा टिकाव धरून आहे. आज हीच परंपरा जैवविविधता संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

माणूस भटक्या अवस्थेत असताना कडे-कपारीत, गुहेत राहत होता. प्राण्यांची शिकार करत होता. कंदमुळे गोळा करत होता. हे सर्व करताना जंगलातून भटकताना त्याला सतत आपल्या जीवाची भीती असे. या भीतीवरील उपाय त्यानं शोधला होता, तो कर्त्याकरवित्या देवाची मनधरणी करण्याचा! 

त्या काळात आप तेज, वायू या नैसर्गिक शक्तींना स्वतःच्या बचावासाठी आवाहन करणे, एवढेच त्यांच्या हातात होते. जंगलातून हिंडताना जंगलातील एखाद्या वृक्षाला, अथवा ज्या प्राण्यापासून भय त्यालाच बचावासाठी पुजायचे. या साऱ्या प्रक्रियेतूनच देवराईचा जन्म झाला असावा. देवपूजेची प्रथाही रानवट होती. प्राणी मारायचा आणि देव नामक दगडाला रक्ताचा अभिषेक आणि मांसाचा वशाट नैवेद्य दाखवायचा, अशी होती. बऱ्याच टिकाणी थोड्या फार फरकाने याच प्रथेचे पालन होताना दिसते. त्यांनी देवराई विषयी जी निरीक्षणे वेळोवेळी नोंद केलेली आहे, त्यांचे दर्शन धारबांदोडा तालुक्यात साकोर्डा, धारबांदोडा, दाभाळ, शिगाव, कुळे अशा पंचायत क्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या गावोगावी राखून ठेवलेल्या देवरायांत अनुभवायला मिळायचे.

धारबांदोडा तालुका एककाळी जंगलसमृद्ध सांगेचा भाग होता, ज्याला जुन्या काळी हेमाडबार्से महाल म्हणून ओळखले जायचे. रगाडो नदीपल्याड बारा भूमका आणि वेताळ बेताळाची ऐतिहासिक, पुरातत्वीय महत्व असलेली मंदिरे देवराईत वसलेली आहेत. शिगावात एकेकाळी दोन देवराया तेथील आदिवासी आणि जंगल निवासी समाजांनी राखून ठेवल्या होत्या. आज त्यांचे नाममात्र अस्तित्व केवळ लोकधर्मामुळे टिकून राहिलेले आहे. देवरायांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आज आपण नियोजनबद्ध प्रयत्न केले तरच हा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा टिकेल आणि आमचे जगणेही सुंदर आणि समृद्ध होईल.


- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५