युवकाची निर्दोष मुक्तता : १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा होता आरोप

पणजी : पेडणे तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीचे २०२१ मध्ये अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात पीडित मुलगी, तिचे वडील तसेच साक्षीदारांनी न्यायालयात आपले जबाब फिरवले आहेत. हे निरीक्षण नोंदवून पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी २३ वर्षीय संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी मुलगी ११ डिसेंबर २०२१ पासून बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पेडणे पोलिसांनी १२ डिसेंबर २०२१ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलगी १५ डिसेंबर रोजी स्वतःहून घरी परतल्यानंतर बिगर सरकारी संस्थेसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी १९ वर्षीय मुलाच्या विरोधात अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला १५ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. संशयिताला न्यायालयाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आणि ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संशयिताविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला गेला.
सबळ पुरावे नसल्याचा दावा
संशयित युवकातर्फे अॅड. साहील सरदेसाई यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात असा दावा केला की, या प्रकरणात कोणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत. तसेच, पीडित मुलगी, तिचे वडील, तसेच इतर नातेवाईक आणि साक्षीदारांनी न्यायालयात आपले जबाब फिरवले आहेत. त्यामुळे खटल्यात सबळ पुरावे नसल्याचा दावा त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाला पुराव्याअभावी या प्रकरणात निर्दोष मुक्त केले.