गोव्यात 'मॅरिटाईम बोर्ड' स्थापनेची प्रक्रिया सुरू

गुरेगाव-मुंबई येथील इंडिया मॅरिटाईम सप्ताह परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात 'मॅरिटाईम बोर्ड' स्थापनेची प्रक्रिया सुरू

गोरेगाव-मुंबई येथे ‘इंडिया मॅरिटाईम सप्ताह’ परिषदेत महत्त्वपूर्ण दस्तावेज प्रदर्शित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री दिगंबर कामत, मंत्री सुभाष फळदेसाई व इतर.

मुंबई : गोव्यातील सर्व सागरी संबंधित कामांसाठी ‘सिंगल विंडो’ मंजुरी मिळवण्याच्या उद्देशाने गोवा मॅरिटाईम बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया तसेच ‘गोवा मॅरिटाईम मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांनी राज्यातील सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भागधारकांना यावेळी आवाहन केले.
मुंबई-गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मॅरिटाईम सप्ताह’ परिषदेतील गोवा सत्रात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या सत्राचा विषय ‘ब्ल्यू मीट्स ग्रीन: गोवा मॉडेल फॉर सस्टेनेबल मॅरिटाईम डेव्हलपमेंट’ असा होता. यावेळी बंदर खात्याचे मंत्री दिगंबर कामत, अंतर्गत जलमार्ग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. विनोदकुमार, कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टाविओ रॉड्रिग्ज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही गोवा राज्य समिती स्थापन केली आहे आणि तिच्या मार्गदर्शनाखाली राज्य मॅरिटाईम मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या आराखड्याचा मुख्य हेतू आमच्या नद्या आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवून राज्याला मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कार्यक्षम बनवणे हा आहे. या मॅरिटाईम मास्टर प्लॅनमध्ये नवीन पर्यटन मार्ग, आधुनिक मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा, जहाजबांधणीचा विस्तार आणि सुदृढ सागरी लॉजिस्टिक्सचा समावेश आहे. या सर्व गोष्टी गोव्याची 'ब्ल्यू इकॉनॉमी' बळकट करतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
‘जहाजबांधणी व्हिजन २०४७ डॉक्युमेंट’ अंतर्गत सर्वसमावेशक जहाजबांधणी धोरण लवकरच लागू केले जाईल. गोवा जहाजबांधणी क्षेत्रात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी प्रगत जहाजे बांधत आहे, ज्यात पूर्ण इलेक्ट्रिक आणि हायब्रिड बोटींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुरगाव बंदरातील आंतरराष्ट्रीय आणि देशी क्रूझ टर्मिनल्स पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देत आहेत. पणजीमधील नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्णत्वाकडे असून, ते जलपर्यटनाला प्रोत्साहन देईल आणि सागरी सुरक्षा वाढवेल, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यात सात शाश्वत जेटी आणि राष्ट्रीय जलमार्गांवर ४४ जेटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा रस्त्यांवरील गर्दी कमी करून वाहतुकीचा वेळ वाचवण्यास मदत करेल. मुंबई-गोवा मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यावरही विचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा जहाजबांधणी क्षेत्रात नंबर वन राज्य करण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी आम्हाला गोव्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांची साथ आणि मदत लागेल. आमच्यात देशातील कोणत्याही राज्याशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे.
- दिगंबर कामत, बंदर खात्याचे मंत्री

गोव्यातील वॉटर टॅक्सी योजना कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर तयार करत आहोत. या योजनेमुळे पर्यटन, व्यापार, उद्योग आणि रोजगार क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. या वॉटर टॅक्सी राष्ट्रीय जलमार्गांवर तैनात करून त्या ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि चर्च यांना जोडल्या जातील.
- सुभाष फळदेसाई, अंतर्गत जलमार्ग मंत्री