जेनिटो तुरुंगात गिरवतोय पोर्तुगीज भाषेचे धडे

तुरुंग प्रशासनाने दिली परवानी : ड्रग्ज प्रकरणातील शिक्षा झालेला कैदी करतोय मार्गदर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
जेनिटो तुरुंगात गिरवतोय पोर्तुगीज भाषेचे धडे

पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याच्यावर करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आणि न्यायालयीन कोठडीत असलेला सराईत गुंड जेनिटो कार्दोझ पोर्तुगीज भाषेचे धडे गिरवत अाहे. त्यासाठी ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी त्याला पोर्तुगीज भाषा शिकवत आहे.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह आठ जणांना अटक करून कारवाई केली.
न्यायालयाने सर्व संशयितांना प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान २ ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकरने पोलिसांना जबाब दिला. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत असल्याचे, तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हटल्याचे रामा यांनी आपल्या जबाबात सांगितले. याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे देण्यात आले. दरम्यान, जेनिटोने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. याच दरम्यान जेनिटोने तुरुंग प्रशासनाकडे पोर्तुगीज भाषा शिकण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यानुसार, तुरुंग नियमानुसार, त्याला परवानगी देण्यात आली. त्यासाठी जेनिटो ड्रग्ज प्रकरणात २०१४ मध्ये गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १५ लाखांच्या ड्रग्जसह अटक केलेला आणि न्यायालयाने १५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या एका पोर्तुगीज कैदीची मदत घेत आहेत. मागील आठ दिवस जेनिटो पोर्तुगीज भाषाचे धडे गिरवत आहेत.

संशयितांची ओळख परेड नाही
रामा काणकोणकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणात अजून जेनिटोसह इतर सात संशयितांची ओळख परेड झाली नाही. तसेच रामा काणकोणकर याचा न्यायदंडाधिकाऱ्याकडे जबाब नोंद केलेला नाही. दरम्यान, न्यायालयाने जेनिटोसह सर्व संशयितांना ३१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

दोघांच्या मृत्यूप्रकरणातील शिक्षेला आव्हान
शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर १० मे २००९ रोजी क्षुल्लक कारणामुळे झालेल्या झटापटीत संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांड यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने जेनिटो कार्दोझ याच्यासह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या तिघांना सुनावण्यात आलेली तीन वर्षांची सक्तमजुरी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. याला जेनिटोने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा