गोव्यासह देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांची पडताळणी

निवडणूक आयोगाची घोषणा : पात्र मतदारांना जोडणे, त्रुटी दूर करणे हा उद्देश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यासह देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांची पडताळणी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने कार्यक्रमाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये ‘मतदार यादीचे पुनरावलोकन’ (एसआयआर) यशस्वीरीत्या लागू झाल्यानंतर, आता गोव्यासह देशातील इतर निवडक राज्यांमध्येही एसआयआरचा दुसरा टप्पा लागू करण्याची घोषणा केली आहे. या दुसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुरुवातीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी छठ सणाच्या निमित्ताने सर्वांना, विशेषतः बिहारच्या ७.५ कोटी मतदारांना शुभेच्छा दिल्या. बिहारमध्ये एसआयआर यशस्वी झाल्यानंतर, देशातील सर्व ३६ राज्य निवडणूक आयुक्तांसोबत दोन बैठका आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये देशभरात सुरू असलेल्या ‘मतदार यादीचे पुनरावलोकन’च्या अनुभवांवर चर्चा करण्यात आल्याचे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने आता निवडक १२ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना ज्ञानेश कुमार म्हणाले, जे पात्र नागरिक अद्याप मतदार यादीत नाहीत, त्यांची नावे यात समाविष्ट करणे. तसेच अपात्र ठरलेल्या किंवा ज्यांची नावे दोनदा समाविष्ट आहेत, ती यादीतून काढून टाकणे.
ज्ञानेश कुमार यांनी यावेळी नमूद केले की, १९५१ ते २००४ पर्यंत आठ वेळा असे ‘मतदार यादीचे पुनरावलोकन’ झाले आहे, तरीही सर्व राजकीय पक्ष वेळोवेळी मतदार यादीतील त्रुटींबाबत तक्रारी करत असतात. त्यामुळे या नवीन टप्प्यात त्रुटी दूर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मतदार यादी गोठवली जाणार
१) ज्या राज्यांमध्ये हे ‘मतदार यादीचे पुनरावलोकन’ होणार आहे, तेथील मतदार सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून गोठवण्यात येणार आहे. प्रत्येक बूथवर एक बीएलओ आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक ईआरओ तैनात असेल.
२) सर्व मतदारांसाठी ‘इन्युमेरेशन फॉर्म’ छापले जातील. प्रत्येक बीएलओ किमान तीन वेळा प्रत्येक घरी जाऊन माहिती गोळा करेल, असे आयुक्तांनी सांगितले.
३) जे मतदार आपल्या क्षेत्रातून बाहेर आहेत, ते हा फॉर्म ऑनलाईन देखील भरू शकतील. या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा फॉर्मची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...........
गोव्यात मतदार यादी केली जाणार ‘फ्रीज’
गोव्यासह ज्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ मोहीम होणार आहे, त्या सर्व राज्यांमध्ये सोमवार रात्री १२ वाजल्यापासून मतदार यादी ‘फ्रीज’ केली जाणार आहे. म्हणजेच यापुढे या यादीत कोणतेही तत्काळ बदल होणार नाहीत.

‘या’ राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ‘एसआयआर’
दुसऱ्या टप्प्यातील एसआयआर कार्यक्रम गोव्यासह अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत राबवला जाईल, अशी माहिती सीईसी ज्ञानेश कुमार यांनी दिली.

आजपासून राबवली जाणार प्रक्रिया
* छपाई/प्रशिक्षण : २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५
* घरोघरी जाऊन गणनेचा टप्पा : ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५
* मतदार याद्यांचे मसुदा प्रकाशन : ९ डिसेंबर २०२५
* दावे आणि हरकतींचा कालावधी : ९ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६
* सुनावणी आणि पडताळणी : ९ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६
* अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन : ७ फेब्रुवारी २०२६


काय आहे ‘एसआयआर’चा उद्देश?
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, एसआयआरचा मुख्य उद्देश मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करणे हा आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र मतदारांना यादीत समाविष्ट केले जाईल. अपात्र मतदारांना यादीतून वगळले जाईल. यादीतील त्रुटी दूर केल्या जातील, ज्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक होईल.


अचूक, पारदर्शक मतदार यादी
हा लोकशाहीचा पाया : मुख्यमंत्री

अचूक व पारदर्शक मतदारयादी हा लोकशाहीचा पाया आहे. यामुळे गोव्यासह १२ राज्यांत स्पेशल इंटेंसिव रिवीजन (एसआयआर) मोहिमेचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. अचूक व पात्र मतदारांचाच मतदार यादीत समावेश असावा, अशी आमची मागणी आहे. ही मोहीम मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याबरोबर बेकायदा वा अपात्र मतदारांची नावे काढण्यास मदतरूप ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचे आदेश तसेच मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदारयादींच्या उजळणीचे काम उत्तर गोव्यात सुरू होणार आहे. मामलेदार, जोड मामलेदार तसेच इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाईल. या कामासाठी आवश्यकतेप्रमाणे इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाईल. - अंकित यादव, जिल्हाधिकारी, उत्तर गोवा