मगो पक्ष नेते डॉ. केतन भाटीकर यांची ठाम भूमिका

पणजी : फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीत आपण मगो-भाजप युतीचा उमेदवार म्हणून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच, अशी ठाम भूमिका डॉ. केतन भाटीकर यांनी घेतली आहे. आपण अजूनही मगो पक्षात असून, आपले नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणूक लढवण्याचा निर्धार कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. डॉ. भाटीकर यांनी प्रुडंट मीडिया वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपला निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिल्यास बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावर भाष्य करताना भाटीकर म्हणाले की, लोकशाहीत कोणताही उमेदवार बिनशर्त निवडून येणार नाही. फोंडा मतदारसंघातील जनतेला आपला आमदार निवडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे निवडणूक होऊ द्या. मी अजून मगो पक्षात आहे आणि माझे नेते सुदिन ढवळीकर माझा गळा कापणार नाही, असा मला विश्वास आहे, असेही भाटीकर म्हणाले.
भाटीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवार निवडण्याची पक्षाची प्रक्रिया असते, त्यानुसार योग्य उमेदवार निवडला जाईल, असे दामू नाईक यांनी म्हटले आहे.

डॉ. भाटीकरांची समजूत काढणार : ढवळीकर
फोंडा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत मगोच्या अध्यक्षांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे धोरण पक्षात असलेल्या प्रत्येकाला लागू होईल. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाध्यक्षांनी जाहीर केला आहे. यावरून, पक्षाचा निर्णय अंतिम असून भाटीकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संकेत वीजमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर दिले आहेत.