गोवा : वीज दरवाढीचा अभ्यास करून बोला!

मंत्री ढवळीकर : घरगुती वीज दरवाढ फक्त ५ टक्के

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : वीज दरवाढीचा अभ्यास करून बोला!

पणजी : काँग्रेस किंवा आपने वीज दर वाढीचा अभ्यास करावा आणि मग बोलावे. सामान्य लोकांसाठी ही वीज दरवाढ अत्यल्प आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
आंदोलन किंवा घेरावाला मी घाबरत नाही. आंदोलन करण्यापूर्वी काँग्रेस किंवा आपने अभ्यास करावा आणि नंतर बोलावे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. वेळेनुसार (टीओडी) वीज दर घरगुती ग्राहकांसाठी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर यावर विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस उपस्थित होते.
संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) मान्यता दिल्यानंतर ऑक्टोबरपासून घरगुती विजेचे दर वाढवले आहेत. ही दरवाढ ५ टक्के आहे. १०० युनिटांपर्यंत पूर्वी १.९० रुपये प्रति युनिट दर होता, तो आता १.९५ रुपये झाला आहे. ही वाढ २.६ टक्के आहे. १०१ ते २०० युनिटांपर्यंत पूर्वी २.८० रुपये होता, तो आता प्रति युनिट २.९० रुपये झाला आहे. २०१ ते ३०० युनिटांपर्यंत ३.७० रुपयांऐवजी आता ३.९० रुपये दर असेल. ३०१ ते ४०० युनिटांपर्यंत ४.९ रुपयांच्या जागी आता ५.१५ रुपये भरावे लागतील. ही वाढ ५ टक्के आहे. ४०१ युनिटांवर ५.८० रुपयांच्या जागी ६.२ रुपये दर असेल. ही वाढ ६.९ टक्के आहे.

स्मार्ट मीटरनंतर ‘टीओडी’चा विचार
घरगुती ग्राहकांसाठी सध्या तरी वेळेनुसार (टीओडी) वीज दर लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ‘टीओडी’ लागू करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. उद्योगांसाठी ‘टीओडी’ लागू झाला आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा