
मडगाव: फातोर्डा येथे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारची धडक बसल्याने प्रवीण सावंत (वय ४८, रा. वेर्णा) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडला. दवंडे, फातोर्डा येथे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोर प्रवीण सावंत रस्ता ओलांडत असताना मडगावहून वेर्णा दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात प्रवीण सावंत गंभीर जखमी झाले आणि बराच वेळ रस्त्यावर पडून राहिले. या अपघातानंतर कारचालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला.
नंतर '१०८' रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रवीण सावंत यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करून नोंद केली आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. धडक देऊन पसार झालेल्या संशयित कारचालकाचा फातोर्डा पोलिसांनी शोध सुरू केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलील गावकर करत आहेत.