
पणजी: वीज खात्याने केलेली वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटरसह 'टाईम ऑफ डे' (Time of Day - ToD) दर लागू केल्यामुळे वीज बिलात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गोव्यातील ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. ही दरवाढ आणि 'टाईम ऑफ डे' दर मागे न घेतल्यास आम आदमी पक्षाच्या (आप) वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा 'आप'चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिला. सोमवारी 'आप'च्या शिष्टमंडळाने मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिकी नाईक उपस्थित होते.
'स्मार्ट मीटर' हा मोठा घोटाळा
पालेकर म्हणाले की, स्मार्ट मीटर आणि 'टाईम ऑफ डे' दरांबाबत खात्याचे मंत्री उद्धटपणे उत्तरे देत आहेत, तर अधिकारीही स्पष्टीकरण देत नाहीत. यामुळे लोकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. घरगुती ग्राहकांना 'टाईम ऑफ डे' दर लागू होणार की नाही आणि लागू झाल्यास कधीपासून याची उत्तरे वीज खात्याने देणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, स्मार्ट मीटर अजून लावले नसले तरी, खात्यामार्फत छुप्या पद्धतीने शुल्क (Charge) घेतले जात आहे. स्मार्ट मीटर हा एक मोठा घोटाळा असून, जनतेला लुटण्याचे नवे साधन आहे, असा आरोप त्यांनी केला.
थकीत वसुलीवर लक्ष द्या
अमित पालेकर यांनी पंजाब सरकारचा संदर्भ देत सांगितले की, पंजाब सरकार २५० युनिट मोफत वीज देते, पण आम्ही गोवा सरकारकडे मोफत विजेची मागणी करत नाही. याऐवजी वीज खात्याने थकीत रक्कम वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करावे. अन्य सरकारी खात्यांचेच वीज खात्याकडे सुमारे ४०० कोटी रुपये येणे बाकी आहे.
'टाईम ऑफ डे' दर लागू करून सरकार जनतेला पुन्हा एकदा पाषाण युगात (Stone Age) ढकलत आहे. जनतेने संध्याकाळी दिवे बंद करून अंधारात बसावे, अशी सरकारची अपेक्षा आहे का, असा सवाल त्यांनी केला. या विरोधात 'आप' घरोघरी जाऊन जनतेमध्ये जागृती करणार असल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले.