रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस त्यात 'गुगल मॅप'वरील लोकेशनचा अंदाज चुकल्याने घडली घटना

म्हापसा: 'गुगल मॅप'वरील लोकेशनचा अंदाज चुकल्यामुळे खोर्जुवे, हळदोणा येथील फेरी धक्क्यावरून एक जीप गाडी थेट मांडवी नदीच्या पात्रात गेल्याची घटना घडली. सुदैवाने, गाडीचा चालक अमनदीप सिंग मुल्तानी (रा. मयडे, मूळ चंदीगढ) हा युवक गाडीतून बाहेर पडला आणि नदीतून पोहून बाहेर आल्याने बचावला आहे.

पावसात घडली दुर्घटना
ही दुर्घटना सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. अमनदीप सिंग मुल्तानी हा खुल्या जीप गाडीने खोर्जुवेहून मयडेच्या दिशेने जाण्यासाठी 'गुगल मॅप'वरील लोकेशनचा आधार घेत होता. घटनेच्या वेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. ही जीप खोर्जुवे येथील बंद असलेल्या फेरी धक्क्यावर पोहोचली. जोरदार पाऊस आणि अंधारामुळे चालकाला परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि जीप थेट नदीत कोसळली.

जीप नदीत पडताच चालक अमनदीपने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण पाण्यामुळे तो उघडला नाही. अखेरीस, त्याने खुल्या जीपच्या वरील प्लास्टिकच्या आवरणाची चैन काढून मागील बाजूने पाण्यात उडी मारली आणि पोहत नदीबाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तो मयडे येथील घरी गेला.

स्थानिक तरुणांच्या मदतीने जीप बाहेर काढली
सकाळी १०.३० च्या सुमारास म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी स्थानिक युवक अमन, नीलेश आणि योगेश यांच्या मदतीने गळ टाकून नदीत बुडालेल्या जीपचा शोध घेतला. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने ही गाडी ओढून नदीतून बाहेर काढण्यात आली.

आमदारांकडून बॅरिकेड्सची मागणी
स्थानिक आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यापुढे अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी, बंद असलेल्या या फेरी धक्क्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स (Barricades) बसवावेत, अशी मागणी त्यांनी नदी परिवहन खात्याकडे (River Navigation Department) पत्र पाठवून केली आहे. तसेच, वाहन चालकांनी 'गुगल मॅप'चा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.