भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा आरोप

पणजी : माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांचे निधन होऊन तेरा दिवसही झाले नसताना काँग्रेस पक्षाला उमेदवार शोधण्याची घाई झाली आहे, यातून काँग्रेसला सत्तेची किती हाव आहे हेच दिसून येते, असा थेट निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी साधला. बेतोडा येथे आयोजित दिवंगत रवी नाईक यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
अखिल भारतीय काँग्रेस समिती, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे लोकसभा खासदार, आमदार आणि माजी आमदार यांसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी, रवी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकही शोक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. एवढेच नव्हे तर, काँग्रेसने कोणताही श्रद्धांजली किंवा शोकसभा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला नाही.
काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज
स्व. रवी नाईक यांनी ३० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाची सेवा केली. २००५ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्ष मोठा केला होता. अशा नेत्याला काँग्रेसने विसरणे दुर्दैवी आहे. ‘आजच्या घडीला काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे,’ असा टोलाही दामू नाईक यांनी यावेळी लगावला.

- अमरनाथ पणजीकर, अध्यक्ष, गोवा प्रदेश काँग्रेस समिती माध्यम विभाग