अफवा न पसरविण्याचे आवाहन : पोलिसांकडून पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

पणजी : गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत लहान मुलांचे अपहरण करण्याचे प्रयत्न झाल्याचे दावे सोशल मीडियासह स्थानिक पातळीवर करण्यात आले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी सर्व तक्रारींची सखोल चौकशी केल्यानंतर हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच खोटी माहिती पसरवणे टाळावे, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, वाळपई पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी अपहरणाचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, होंडा येथील १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न दोन अज्ञात व्यक्तींनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासात पोलिसांनी संबंधित मुलाची व बिगर सरकारी संस्थेची मदत घेऊन चौकशी केली असता, त्या मुलाने अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले. त्यानंतर, ९ ऑक्टोबर रोजी डिचोली पोलिसांनी आणखी एका अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला. या तक्रारीनुसार, चार अज्ञात व्यक्ती व्हॅनमधून आले व शाळेतून घरी परतणाऱ्या १३ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तपासाअंती या प्रकरणातही मुलाने खोटा बनाव केल्याचे समोर आले.
याचदरम्यान, पणजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताळगाव येथे १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून वस्तुस्थितीची पडताळणी केली असता, या प्रकरणातही कोणतेही सत्य आढळून आले नाही.
दरम्यान, गोवा पोलिसांनी नागरिकांना अशा अफवांचा प्रसार टाळण्याचे आव्हान केले आहे.
पोलिसांचे पालकांना आवाहन
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही मुले शैक्षणिक ताणतणावामुळे किंवा वैयक्तिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या कथा तयार करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांना सत्य बोलण्यास प्रवृत्त करावे आणि त्यांच्या मनातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या तपासामुळे समाजात जागरूकता वाढते आणि नागरिकांना सत्य-असत्य ओळखण्याची जाणीव होते. सुरक्षित, जागृत आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सतर्कता आणि संयम यामुळेच आपले कुटुंब आणि समाज सुरक्षित राहील, असे आवाहन करत गोवा पोलिसांनी सर्व नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.