केपेतील व्यक्तीची वास्को पोलीस ठाण्यात तक्रार

वास्को : अमेरिकेत जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी केपे येथील एका रहिवाशाने वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशात नोकरीसाठी एखाद्याला पाठविण्यापूर्वी भारत सरकारच्या प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्सकडून परवाना घेणे अनिवार्य आहे. मात्र, कॅप्टन जॉर्ज कन्सल्टन सर्व्हिसेस या कंपनीने असे परवाना नसतानाही तक्रारदाराला अमेरिकेत जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले आणि काही रक्कम घेतली. त्यानंतर, तक्रारदाराला अमेरिकेत न पाठवता मेक्सिकोला पाठवण्यात आले. मेक्सिको येथे पोहोचल्यावर योग्य कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे तक्रारदाराला इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीनंतर तक्रारदाराला पुन्हा भारतात परत पाठवण्यात आले. तक्रारीत म्हटले आहे की, सदर सर्व्हिसेसकडून ७ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि इमिग्रेशन कायदा १९८३ च्या कलम १० व २४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयूर सावंत पुढील तपास करीत आहेत.