महाराष्ट्रातील २६ वर्षीय युवतीचे मृत्यू प्रकरण

म्हापसा : पर्वरी येथे सलून चालवणाऱ्या अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथील २६ वर्षीय युवतीचा दारूमध्ये गुंगीचे औषध दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी रिझवान हुसेन (रा. कांदोळी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. संशयिताला म्हापसा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली असून, २० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मृत युवतीच्या भावाने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गेल्या तीन वर्षांपासून रिझवान हुसेनच्या मालकीच्या कळंगुट येथील सलूनमध्ये काम करत होती. जानेवारी २०२५ मध्ये तिने नोकरी सोडून पर्वरी येथे स्वतःचे सलून सुरू केले. मेहनतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करणार्या या युवतीच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी १.३० वाजता युवतीने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधला. तिने दिवाळी निमित्त भावाला नवीन कपडे घेण्यासाठी पैसे पाठवले असल्याचे सांगितले; मात्र नंतर मोबाईल बंद झाला. रात्री ९.३० वा. दरम्याने रिझवान हुसेनने युवतीच्या आईला फोन करून ती आजारी असल्याचे सांगितले आणि इस्पितळात दाखल असल्याची माहिती दिली. दहा मिनिटांनंतर त्याने पुन्हा फोन करून मुलगी मृत झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कळंगुट पोलिसांनी युवतीच्या भावाशी संपर्क साधून मृतदेह गोमेकॉ रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
युवतीला दारूमध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १२३ व १०६ (१) अंतर्गत रिझवान हुसेनविरुद्ध गुन्हा नोंदवला. म्हापसा न्यायालयाने संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शवचिकित्सेनंतर व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे.
पुढील तपास कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर करीत आहेत.
युवतीचा मानसिक, शारीरिक छळ!
फिर्यादी भावाच्या तक्रारीनुसार, युवतीने स्वतःचे सलून सुरू केल्यापासून रिझवान हुसेन, त्याची पत्नी व भाऊ तिला जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरत मानसिक छळ करत होते. तसेच रिझवान हुसेनवर तिचा शारीरिक छळ केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रिझवान वारंवार दारूमध्ये काहीतरी मिसळून तिला जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडत होता तसेच फिर्यादीने लैंगिक अत्याचाराचा संशयही व्यक्त केला आहे.