पणजी पोलीस स्टेशनबाहेर मारामारी; दोन गटांतील सात जणांना अटक

पूर्ववैमनस्यातून दोन्ही गट एकमेकांना भिडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी पोलीस स्टेशनबाहेर मारामारी; दोन गटांतील सात जणांना अटक

पणजी : पूर्ववैमनस्यामुळे झालेल्या भांडणानंतर रामनगर- बेती आणि इंदिरानगर- चिंबल या दोन गटाचे सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी पणजी पोलीस स्थानकात आले. मात्र, पोलीस स्थानकाच्या बाहेर दोन्ही गटांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि एकास गंभीर मारहाण झाली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.१५ वाजता रामनगर- बेती गटातील देवू कवास, त्याची पत्नी ज्योती, मुलगी रोशनी आणि मुलगा सोहील, तसेच इंदिरानगर- चिंबल गटातील इमरान काबुर्गी, याकूब अल्लाबक्क्ष वाल्लीकर आणि मुबारक सिकंदर भंडारी यांच्यात पूर्ववैमनस्यामुळे वाद घडला होता. तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गट पोलीस स्थानकात आले असता, पोलीस स्थानकाच्या बाहेर त्यांच्यात पुन्हा मारामारी झाली.

या प्रकरणी हवालदार सतीश माजे यांनी दोन्ही गटांविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक यांनी या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे.

याकूब वाल्लीकरला जबर मारहाण

इंदिरानगर- चिंबल गटातील याकूब अल्लाबक्क्ष वाल्लीकर याला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्याच्या डाव्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही गटांनी पुन्हा एकमेकांवर हल्ला केला.

हेही वाचा