चांदेल येथे अपघात : पावसात रस्त्याच्या अंदाज न आल्याने घटना

पेडणे : गोव्यात असलेल्या आपल्या बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून घरी परत येत असलेल्या विलवडे येथील २० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी चांदेल येथे ही घटना घडली.
मृत युवकाचे नाव ऋषिकेश बापूजी दळवी असून, तो सध्या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.
रविवारी सायंकाळी बांदा-हसापूर मार्गावरील चांदेल येथील रस्त्यावर अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, ऋषिकेश मुसळधार पावसात दुचाकी चालवत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने झाडाला धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
ऋषिकेशने बांदा येथील खेमराज महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे.
भाऊबीज ठरली शेवटची..
ऋषिकेश रविवारी दुपारी आपल्या बहिणीकडे भाऊबीज साजरी करण्यासाठी गेला होता. बहिणीकडून केलेली भाऊबिजेची ओवाळणी ही त्याच्यासाठी शेवटची ठरली.