बंगळुरूतील डॉक्टरचा सिंधुदुर्गात आढळला मृतदेह

तिलारीत सापडली रक्ताळलेली कार : खुनाचा उलगडा होईना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
बंगळुरूतील डॉक्टरचा सिंधुदुर्गात आढळला मृतदेह

पणजी : काही दिवसांपूर्वी तिलारी (Tilari) येथील एका पुलाखाली रक्ताळलेली बेवारस कार (abandoned car) आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते, मात्र सुगावा लागत नव्हता. अखेरीस कणकवलीत (Kankavali) एक अनोळखी मृतदेह आढळला आणि या प्रकरणाचा अर्धा गुंता सुटला. हा मृतदेह बंगळुरू (bengaluru) येथील डॉक्टरचा (Doctor) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्यांचा खून का करण्यात आला, तो कोणी केला आणि कार तिलारीत का फेकून देण्यात आली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.


याबाबतची माहिती अशी की, रक्ताने माखलेली कार दोडामार्ग पोलिसांना (Dodamarg) सापडली होती. काही स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. तिलारीतील धरणाचा कालवा नदीला मिळतो, त्या ठिकाणच्या पुलाखाली ही कार आढळली होती. मात्र आसपास कोणाचाही ठावठिकाणा लागला नव्हता. या कारची नंबर प्लेटही गायब होती. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. कारच्या चेसीस नंबरवरून पोलिसांनी कारमालकाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. 

दरम्यान, कणकवलीतील साळीस्ते येथे एक मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. बंगळुरू येथील ५३ वर्षीय डॉक्टर श्रीनिवास रेड्डी (Srinivas Reddy) यांचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. जी कार दोडामार्ग पोलिसांना सापडली होती, ती कार याच व्यक्तीची असल्याचेही समोर आले आहे. मात्र या डॉक्टरची हत्या कोणी केली, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. 


सिंधुदुर्गात कशासाठी?

बंगळुरूमधील मृत डॉक्टर सिंधुदुर्गात कशासाठी आला होता? तो कारने एकटात आला होता की त्याच्यासोबत आणखी काही जण होते? साळीस्ते येथे खून करून डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांना फेकून दिल्यानंतर कार तिलारीत का सोडून दिली? त्यातून आलेले लोक कुठे व कसे गेले, या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

तपासात कमालीची गुप्तता 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर हा उच्चभ्रू वर्गातील असल्यामुळे याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. मालमत्तेचा किंवा अन्य कोणत्या वादातून हा खून झाला का, याबाबत लवकरच उलगडा होणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून धागेदोरे मिळतात का, याचीही चाचपणी पोलीस करत आहेत. 


हेही वाचा