शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला : मायणा, न्हावेली, मयेसह इतर भागात हानी

मये येथे पावसाच्या तडाख्यात आडवी पडलेली भात शेती.
डिचोली : डिचोली तालुक्यात यावर्षी भातपीक चांगले असताना, ऐन कापणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे ७० ते ८० टक्के भातशेती सपशेल आडवी झाली असून, तयार कणसांना कोम फुटल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याने त्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
डिचोली तालुका शेतकी उत्पादक संघाचे अध्यक्ष विश्वंभर गावस यांनी सांगितले की, मायणा न्हावेली येथील सुमारे २० हेक्टर भातपीक कापणीसाठी सज्ज होते. मात्र, पावसामुळे ९० टक्के भात आडवे झाले आणि कणसांना कोम आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मये येथील प्रगतशील शेतकरी सखाराम पेडणेकर यांनीही मये भागात ७० ते ८० टक्के शेती आडवी झाली असून, सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. साळ, मेणकुरे, लाटंबार्से, न्हावेली, नार्वे, मुळगाव, सुर्ला आणि इतर भागांतील शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
डिचोली तालुक्यात तसेच राज्यात विविध ठिकाणी पावसामुळे भात शेतीची हानी झाल्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली आहे. या प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, त्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत तलाठी स्तरावर शेतीची पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकार निश्चित दखल घेईल आणि योग्य मोबदला देण्याबाबतही सरकार लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.