बेकायदा घरे नियमित करण्यासाठी सरकारचे ऐतिहासिक पाऊल

पणजी : अनेक वर्षांपासून कागदपत्रांच्या अभावामुळे आणि परवानग्यांच्या त्रासामुळे असुरक्षित जीवन जगत असलेल्या गोमंतकीय कुटुंबांसाठी 'माझे घर' योजना स्थिरता, सुरक्षितता आणि शांतता घेऊन आली आहे. घर हे केवळ विटा आणि भिंती नसतात, तर ते प्रत्येक कुटुंबाचे हृदय असते. या योजनेमुळे आता गोमंतकीयांचे स्वतःच्या घराचे मालकी हक्क मिळवण्याचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होईल, असे मत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.
पाटो येथील कला व संस्कृती सभागृहात ताळगाव आणि पणजी मतदारसंघांसाठी 'माझे घर' फॉर्म वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या या योजनेद्वारे, बेकायदेशीर मानली गेलेली घरे नियमित करण्यासाठी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंत्री मोन्सेरात यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की, ‘माझे घर’ योजनेअंतर्गत सर्व पात्र कुटुंबांनी अर्ज करून आपल्या घरांचे संरक्षण करावे. हे पाऊल पुढच्या पिढ्यांसाठी स्थैर्य आणि सुरक्षिततेचा पाया ठरेल.
मुख्यमंत्री सावंत यांचे मानले आभार
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सततच्या मार्गदर्शन, पाठबळामुळेच आज हजारो कुटुंबांचे दीर्घकाळचे स्वप्न वास्तवात उतरत आहे, असे सांगत त्यांचे आभार मानले.