केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक : बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये शोकसभेचे आयोजन

फोंडा : समाजाच्या तळागाळातील लोकांचा उत्कर्ष साधण्यासाठी शिक्षण हा एकच प्रभावी पर्याय आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून येऊ शकते हे माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर दाखवून दिले. ग्रामीण भागातील मुले शिकून मोठी व्हावीत म्हणून त्यांनी फोंड्याला शैक्षणिक हब बनवले. त्यांचे हेच लोकहितार्थ विचार आम्ही सर्वजण मिळून पुढे नेऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांच्या स्मरणार्थ बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, रवी नाईक एक चांगले व्हॉलीबॉलपटू होते आणि त्यांनी खेळाडूवृत्ती जोपासली होती. ते खेळातील चांगले 'स्मॅशर' होते आणि शेवटपर्यंत त्यांनी वाईट गोष्टी 'स्मॅश' करण्यातच आयुष्य घालवले. त्यांची संघर्ष करण्याची वृत्ती युवकांना मार्गदर्शक ठरेल.आमदार व माजी मंत्री गोविंद गावडे म्हणाले, त्यांनी सुरुवातीपासून जे लोकहितार्थ निर्णय घेतले, ते आजही गोमंतकाचे हित जपत आहेत आणि आगामी अनेक शतके ते कायम राहतील. अनेक लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वांना पुरून उरले.
यावेळी आमदार वीरेश बोरकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, नरेंद्र सावईकर, महेंद्र रायकर, अॅड. नेल्सन सुवारिस, यांच्यासह हरवळे रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, साहित्यिक मिलिंद माडगूत आणि अन्य मान्यवरांनीही स्व. रवी नाईक यांना समर्पक शब्दात आदरांजली व्यक्त केली. अक्षता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
रवी नाईक यांचे विचार स्पष्ट असत. सर्वांचा उत्कर्ष हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. त्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच आज ग्रामीण भागातील मुले शिकून मोठी झाली आहेत, त्यामुळे आज उच्च शिक्षण घेऊन त्यांना खरी आदरांजली द्यायला हवी.
- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री