करंझाळे समुद्रकिनारी ओशनमॅन स्पर्धा रद्द; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

स्पर्धकांची ३.२६ लाखांची फसवणूक, मुलांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
करंझाळे समुद्रकिनारी ओशनमॅन स्पर्धा रद्द; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

पणजी : करंझाळे येथील समुद्रकिनारी रविवारी सकाळी आयोजित ओशनमॅन स्पर्धा रद्द झाली. स्पर्धा रद्द झाल्याने स्पर्धकांची ३.२६ लाखांची फसवणूक तसेच मुलांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आयोजक कपिल अरोरा (५०, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी डाॅ. सूर्यकांत भिरूड (डोंबिवली मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आयोजक कपिल अरोरा यांनी करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर रविवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ७.३० दरम्यान ओशनमॅन स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी आयोजकांनी संबंधित यंत्रणेकडून आवश्यक परवानगी घेतली नाही. स्पर्धेच्या ठिकाणी तिथे जीवरक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याने स्पर्धक आणि मुलांच्या जीव धोक्यात घातला. याशिवाय आयोजकांनी स्पर्धकांकडून ३,२६,१०० रुपये नोंदणी शुल्क घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी आयोजक कपिल अरोरा याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता, आयोजकांनी करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर ओशनमॅन स्पर्धा आयोजित करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. 

करंझाळेतील मच्छीमारांचा विरोध

करंझाळे समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या ओशनमॅन या खासगी कार्यक्रमाच्या आयोजनास स्थानिक मच्छीमारांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने स्पर्धा अचानक थांबवावी लागली. स्थानिक मच्छीमारांच्या गटाने स्पर्धेला विरोध करत आयोजकांनी आवश्यक परवानग्या न घेतल्याचा आरोप केला. या वादामुळे सुमारे ८०० सहभागींना ज्यात अनेक आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंचा समावेश होता, त्यांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

रविवारी रापणीचा दिवस असल्याने स्थानिक मच्छीमारांनी रात्री समुद्रात जाळे टाकले होते. या स्पर्धेमुळे स्थानिक मच्छीमारांना रापण ओढण्यास अडथळे येत होता. तसेच यापूर्वी स्थानिक मच्छीमारांनी या स्पर्धेच्या आयोजनाला आक्षेप घेऊनही आयोजकांनी स्पर्धा सुरू केल्याने मच्छीमार आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

आवश्यक मंजुरी घेतल्या : आयोजक

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीची जाळी टाकायला सुरुवात केल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि बंदर विभागाकडून सर्व आवश्यक मंजुरी त्यांनी घेतल्या होत्या, त्यामुळे मच्छीमारांचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा