
नवी दिल्ली: बिहारमध्ये 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (Special Intensive Revision - SIR) मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने (Election Commission) गोव्यासह देशभरातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
'एसआयआर'चे उद्दिष्ट
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, बिहारमध्ये 'एसआयआर' यशस्वीपणे लागू केल्यानंतर देशभरातील सर्व ३६ राज्यांच्या निवडणूक आयुक्तांशी चर्चा झाली. आता निवडलेल्या १२ राज्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला जाईल. या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पात्र मतदारांना यादीत जोडणे आणि अपात्र नावांना यादीतून वगळणे हे आहे. १९५१ ते २००४ या काळात आठ वेळा असे पुनरीक्षण झाले आहे, पण राजकीय पक्षांच्या तक्रारींमुळे आता आयोग याकडे विशेष लक्ष देत आहे.
गोव्यात आज रात्रीपासून मतदार यादी 'फ्रीज'
ज्या राज्यांमध्ये 'एसआयआर' मोहीम होणार आहे, त्या सर्व राज्यांमध्ये आज सोमवार रात्री १२ वाजल्यापासून मतदार यादी 'फ्रीज' (Freeze) केली जाणार आहे. म्हणजेच यापुढे या यादीत कोणतेही तात्काळ बदल होणार नाहीत.
'एसआयआर' प्रक्रियेची माहिती:
या १२ राज्यांमध्ये मोहीम
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, दुसऱ्या टप्प्यातील 'एसआयआर' अंदमान निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत होणार आहे.
गोव्यासह या १२ राज्यांमध्ये ही प्रक्रिया उद्यापासून (मंगळवार) सुरू होईल. या पुनरीक्षणानंतर अंतिम मतदार यादीचा मसुदा (फायनल ड्राफ्ट लिस्ट) ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केला जाईल.