सहाय्यक अभियंत्यांची भेट : लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

वाळपई : सावर्डे गावात पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील सुमारे ३०० लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. सहाय्यक अभियंता योगेश सावंत यांची भेट घेऊन या संदर्भात ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. समस्या तातडीने न सोडविल्यास महिलांचा घागर मोर्चा नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार असल्याचे अभियंता योगेश सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
तीन महिन्यांपूर्वी सावर्डे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार केली होती. गढूळ पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यानी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन गढूळ पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली होती. आता मात्र या गावामध्ये पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, खास करून महिला भगिनींना याचा जास्त त्रास होत आहे.
या पार्श्वभूमीवर, पंच शिवाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली आणि सहाय्यक अभियंता योगेश सावंत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून सातत्याने या गावांमध्ये पूर्णपणे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. अनेक वेळा स्थानिक ऑपरेटर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळेच आज अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई ताबडतोब दूर करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली असून, त्यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिलेले आहे, असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
.......... चौकट...........
‘घागर मोर्चा’चा इशारा
अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आश्वासन पूर्ण झाले नाही, तर महिलांचा घागर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.