दोघे कामगार जखमी : सात संशयित ताब्यात; सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पेडणे : पेडणे तालुक्यातील पोरस्कडे-उगवेच्या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या रामरिशी रामराज पासवान आणि लाल बहादूर गोड या दोन कामगारांवर मंगळवारी उत्तररात्री २.३० वाजता गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी पेडणे पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे, मात्र मुख्य संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ही घटना नेमकी कशी घडली? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पुरावे गोळा केले असून नक्की गोळीबार कशासाठी झाला आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत भारतीय दंड संहिता कलम १०९ बीएनएस आणि ३ आर/ डब्ल्यू २५ या कलमांखाली संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गोळीबारात जखमी झालेले दोन्ही कामगार गंभीर असून, त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात उपचार सुरू आहेत. एका कामगाराच्या हातातून गोळी आरपार गेली आहे, तर दुसऱ्या कामगाराच्या मानेतून गोळी आरपार गेल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार कोणी आणि का केला, याचा शोध पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे आणि त्यांची टीम घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोरसकडे येथील रेती व्यवसायाशी संबंधित असलेला एक गट रेती काढण्यासाठी होडीतून जात असताना हा गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, उगवे पोरसकडे भागात रेती व्यवसायातून स्पर्धा वाढली आहे. रात्रीच्या वेळी एकमेकांच्या हद्दीत घुसून रेती उपसा केला जात असल्याने वादविवाद आणि मारामारीच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. स्थानिकांच्या मते, रेती व्यावसायिक पोलिसांना अभय देतात, त्यामुळे पोलीस मोठी घटना घडल्याशिवाय याकडे दुर्लक्ष करतात.
हा गोळीबार दोन गटांतील वादातून झाला असावा, या शक्यतेतून पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह
सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी, रेती व्यवसायाशी संबंधित सर्व मजुरांची नोंदणी पेडणे पोलिसांकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यापूर्वीही कामगारांवर हल्ले झाले असून, पोलिसांकडून अभय मिळत असल्याने कायदा सुव्यवस्थेची भीतीच उरली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा करण्यावर बंदी असूनही, परप्रांतीय मजुरांच्या आधारे सरकारी मालमत्तेवर डल्ला मारला जात आहे. चोरट्या पद्धतीने होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या फिरत्या पथकांकडून कारवाईऐवजी दुर्लक्ष केले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
रेती व्यवसायाचे गंभीर दुष्परिणाम
* रेती उपशामुळे उगवे गावातील शेतजमिनी न्हयबाग नदीत कोसळत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी यापूर्वी सरकार दरबारी आणि न्यायालयात केल्या आहेत, मात्र कारवाई होत नाही.
* रात्रीच्या वेळी एकमेकांच्या हद्दीत घुसून रेती उपसा केला जातो. त्यामुळे या व्यवसायातून वर्चस्ववादाची स्पर्धा घातक वळणावर पोहोचली आहे.
* या व्यवसायातून स्पर्धा वाढल्याने रोजचे वाद, विवाद आणि मारामाऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.
पोलिसांवर ‘अभय’ दिल्याचा आरोप
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेती व्यवसायिकांकडून पोलिसांना अभय (संरक्षण) दिले जाते. त्यामुळे पोलीस मोठी घटना घडल्याशिवाय या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात, असा दावा नागरिकांनी केला आहे. न्यायालयाने वेळोवेळी प्रशासनाला रेती व्यवसायावरून सुनावणी दिली असली तरी, सरकारला या व्यवसायावर नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे.
महाराष्ट्रातून बेकायदा रेतीची आवक
बांधकाम क्षेत्राला रेतीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पेडणे तालुक्यातील शापोरा-तेरेखोल नदीत तेवढी रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून शेकडो मोठमोठ्या ट्रकमधून रेती राज्यात आणली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ट्रक बेकायदेशीर रेती घेऊन येत असताना पत्रादेवी चेक नाक्यावर त्यांची तपासणी होत नाही, असेही उघड झाले आहे.
एका कामगारावर शस्त्रक्रिया, स्थिती गंभीर
पोरस्कडे-उगवेच्या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी मंगळवारी झालेल्या गोळीबारात रामरिशी पासवान आणि लालबाबू गोड हे दोन कामगार जखमी झाले. दोघांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पासवानच्या मानेला दुखापत झाली असून वॉर्ड क्र. १०२ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर लालबाबूच्या हाताला आणि पोटाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, प्रकृती नाजूक असल्याने त्याला आयसीयूत ठेवण्यात आले आहे.
बाणसाय येथील गोळीबाराच्या स्मृती ताज्या
माड-बाणसाय येथे ३१ ऑगस्ट २०२२ च्या उत्तररात्री अवैध वाळू उपसा करणाऱ्या मजुरांवर गोळीबार झाला होता, ज्यात युसूफ आलम (२३, झारखंड) चा मृत्यू झाला, तर महंमद साहू (३३) हा मजूर जखमी झाला होता. या प्रकरणात वाळू उपसा करणाऱ्यांवर गोळीबार केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या संशयित जॉर्व्हिस ज्योएल मोराईश याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी मडगाव जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
उगवे येथील गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांना तत्काळ अटक करून कोठडीत टाकले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात भांडणांचे पर्यावसान गोळीबारासारख्या घटनामध्ये होत असल्याने गन्हेगारी गँग निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा धाक उरला नसून भाजप सरकारच्या राजवटीत कायदा, सुव्यवस्था साफ कोलमडली आहे. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते