‘ईडी’चा अधिकारी असल्याचे भासवून सासष्टीतील ज्येष्ठाला २.८ कोटींना गंडा

मनी लाँड्रिंगची थाप मारून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे लुबाडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th October, 11:52 pm
‘ईडी’चा अधिकारी असल्याचे भासवून सासष्टीतील ज्येष्ठाला २.८ कोटींना गंडा

पणजी : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून तसेच आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग केल्याचे सांगून, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सासष्टी तालुक्यातील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून वेगाने तपास सुरू केला आहे.‍‍
‍सासष्टी तालुक्यातील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सायबर विभागात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराला अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांकावरून (९६०७८५१७७९ आणि ७३९८०८२६६९) कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण ईडीचे अधिकारी असल्याचे भासवले. या तोतया अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे आधार कार्डचा वापर एका गंभीर मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगून भीती दाखवली.
४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या प्रदीर्घ कालावधीत तक्रारदारावर 'डिजिटल अरेस्ट' द्वारे सतत दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि चौकशीतून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराला टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास भाग पाडले. या दबावामुळे तक्रारदाराला एचडीएफसी बँकेच्या एका खात्यात ३५ लाख रुपये, एचडीएफसी बँकेच्या दुसऱ्या खात्यात ५० लाख रुपये, येस बँक खात्यात १ कोटी रुपये, इंडसइंड बँक खात्यात ९५ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे एकूण २ कोटी ८० लाख रुपये हडपण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी, कोणत्याही सरकारी संस्थेकडून येणाऱ्या अशा अनाहूत कॉल्सपासून सावध राहावे आणि कोणतीही आर्थिक माहिती किंवा रक्कम त्वरित ट्रान्सफर करण्यापूर्वी स्थानिक पोलिसांशी किंवा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

सायबर विभागात गुन्हा दाखल
फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने तत्काळ सायबर गुन्हे विभागात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सायबर विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात मोबाईलधारकाविरोधात भा. न्या. सं. कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.