वेदना ही केवळ शरीरात आहे. दुःख निर्माण करण्याची गरज नाही. जर तुम्ही जागरूक असाल, तर तुम्ही स्वतःसाठी दुःख निर्माण करणार नाही. एखाद्याने स्वतःसाठी दुःख निर्माण करण्याचे एकमेव कारण म्हणजे तो अजागरूक आहे.

प्र श्न : सद्गुरू, जगात खूप सारे लोक दररोज वेदना सहन करत असतात. वेदनेला कसे सामोरे जावे?
सद्गुरू : वेदना ही शारीरिक गोष्ट आहे. वेदना शारीरिक आहे आणि ती तुमच्यासाठी चांगली आहे, कारण जर तुमच्या आत वेदना नसेल, तर तुमचे शरीर टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता आत्ता सध्या तुमच्याकडे नाही. तुम्ही रस्त्यावर चालत असताना जर समोरून सायकल आली, तर तुम्ही मागे सरकता. हे तुम्ही नम्रतेमुळे करत नाही, तर वेदनेचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत म्हणून करता. जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची वेदना नसती, तर एखादा मोठा ट्रक तुमच्या दिशेने येत असला तरी तुम्ही बाजूला सरकला नसता.
दुःख स्व-निर्मित आहे
वेदना केवळ शरीराची आहे; ती स्वाभाविक गोष्ट आहे. जर वेदना नसेल, तर तुमचा पाय जरी कापला गेला तरी तुम्हाला कळून येणार नाही. पण दुःख तुम्ही स्वतःहून निर्माण केलेले आहे. वेदना आहे पण दुःख नाही असे कसे असू शकते? अशी अनेक उदाहरणे आहेत. असेच एक अप्रतिम उदाहरण म्हणजे सदाशिव ब्रह्मेंद्र. त्यांचा एक दगडी फलक ध्यानलिंग मंदिराच्या परिक्रमेत आहे, जिथे एक माणूस चालत आहे आणि त्याचा हात तलवारीने कापला जात आहे. ही घटना दक्षिण भारतातील नेरूर या ठिकाणी घडली. सदाशिव ब्रह्मेंद्र हे निर्काया - म्हणजेच शरीररहित योगी होते. एखादी व्यक्ती शरीररहित कशी असू शकते?
ज्या प्रकारे हे भौतिक शरीर आहे, त्या प्रकारेच मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर देखील आहे. ऊर्जा शरीराला प्राणमयकोष असे म्हणतात. ऊर्जा शरीरात एकूण ७२,००० नाड्या किंवा मार्ग आहेत ज्यांच्यातून ऊर्जा वाहत असते.
इथे शारीरिकदृष्ट्या अस्तित्वात असण्यासाठी सर्व ७२,००० नाड्या सक्रिय असणे आवश्यक नाही. फक्त काही मूलभूत नाड्यांसह तुम्ही परिपूर्ण शारीरिक जीवन जगू शकता. जर सर्व ७२,००० नाड्या सक्रिय झाल्या, तर तुम्हाला तुमच्या शरीराची जाणीव राहणार नाही. तुमच्या अनुभवात ते अस्तित्वात नसेल. शरीराशिवाय इथे बसण्याच्या स्वातंत्र्याची तुम्ही कल्पना करू शकता का? उदाहरणार्थ, जर तुम्हाला इथे बसून ध्यान करायचे असेल, तर पाय दुखू लागतात आणि काही वेळानंतर तुम्ही फक्त एक पायदुखी म्हणून अस्तित्वात असता. बाकीचे सर्व मानवी गुणधर्म नाहीसे होऊन जातात. पण तुम्ही जर सर्व ७२,००० नाड्या सक्रिय केल्या, तर इथे नुसते बसलात तरी शरीराची जाणीव उरत नाही. तुम्ही तुमचे शरीर हवे तसे वापरू शकता, पण शरीर तुमच्यावर काहीच सत्ता गाजवू शकत नाही.
सदाशिव हे निर्काया होते. त्यांना शरीराची जाणीव नसल्यामुळे कपडे घालण्याचा प्रश्नच त्यांच्या जीवनात कधी उद्भवला नाही. ते एक नग्न योगी होते. ते जसे होते तसेच चालत जात. एके दिवशी ते चालत चालत राजाच्या बागेत गेले. राजा आपल्या राण्यांसोबत नदीकाठी विश्रांती घेत होता. सदाशिव या स्त्रियांच्या समोरून नग्न चालत गेले.
राजाला खूप राग आला. "कोण आहे हा मूर्ख जो माझ्या स्त्रियांसमोर अशा अवस्थेत चालत येतोय?" त्याने त्याच्या सैनिकांना तो कोण आहे हे शोधायला सांगितले. त्यां सैनिकांनी सदाशिवांना हाक मारली. ते मागे वळले नाहीत आणि पुढे चालतच राहिले. सैनिकांना राग आला आणि मागून त्यांनी तलवारीने वार केला. सदाशिवांचा उजवा हात कापला गेला, पण तरीही ते चालतच राहिले. मग सैनिक घाबरले. या माणसाचा हात तुटून पडला तरी तो मागे वळला देखील नाही. तो चालतच राहिला. त्यांना कळले की, हा काही सामान्य माणूस नाही. ते त्यांच्या मागे धावत गेले, राजा आणि इतर सर्वांनी त्यांच्या पाया पडून त्यांना परत आणले आणि त्याच बागेत त्यांना स्थानापन्न केले. आज देखील नेरूरमध्ये त्यांची समाधी आहे. ते खूप शक्तिशाली स्थान आहे.
वेदना ही केवळ शरीरात आहे. दुःख तुम्ही स्वतः निर्माण करत असता. पण ते निर्माण करण्याची गरज नाही. जर तुम्ही जागरूक असाल, तर तुम्ही स्वतःसाठी दुःख निर्माण करणार नाही. एखाद्याने स्वतःसाठी दुःख निर्माण करण्याचे एकमेव कारण म्हणजे तो अजागरूक आहे. तुम्ही जाणूनबुजून स्वतःसाठी दुःख निर्माण कराल का? नाही.
जगभरात प्रसिद्ध असलेले एक उदाहरण म्हणजे येशू. त्यांच्या हाता-पायात खिळे ठोकले जात होते. तुमच्या हाता-पायात खिळे ठोकले गेले, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ओरडाल, किंचाळाल आणि संपूर्ण जगाला शाप द्याल. पण असे दिसते की, त्यांनी म्हटले, "यांना क्षमा करा, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही." दुःख सहन करणारा माणूस असे म्हणू शकतो का? याचा अर्थ तिथे वेदना नाही असा नाही. वेदना होती. कदाचित त्यांचे शरीर तुमच्यापेक्षा जास्त संवेदनशील होते. नक्कीच वेदना होती, पण दुःख नव्हते. जेव्हा त्यांनी म्हटले, "ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही," तेव्हा ते फक्त एवढेच म्हणत होते की, ते लोक अजागरूक आहेत.
तुमची जागरूकता वाढवा
तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना दुःख देण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही अजागरूक आहात. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल जागरूक आहात, केवळ तीच गोष्ट तुमच्या अनुभवाच्या दृष्टीने अस्तित्वात आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जागरूक नाही, ती गोष्ट तुमच्यासाठी अस्तित्वात नाही. हा संदर्भ बदलला गेला पाहिजे. तुमची जागरूकता मर्यादित क्षेत्राकडून मोठ्या आकलनाकडे विकसित झाली पाहिजे.
जेव्हा तुम्ही आत्ता जे आहे त्याचा प्रतिकार करता, तेव्हा वेदना स्वतःहून दुःखाचा गुणाकार करत जाते. आधीच वेदना आहे. तुम्हाला ती तुमच्या आत वाढवून, त्यातून काहीतरी वेगळे बनवण्याची गरज नाही. जेव्हा परिस्थिती आधीच वाईट आहे, तेव्हा तुम्ही शक्य तितक्या सुंदरपणे त्यातून कसे जावे याकडे पाहायला हवे.

- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)