ट्रम्प यांना जर्मन मानद नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव

Story: विश्वरंग |
24th October, 09:50 pm
ट्रम्प यांना जर्मन मानद नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव

जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या 'आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' या राजकीय पक्षाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जर्मन जिल्हा बाड ड्युरखाईमचे मानद नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे मूळ जर्मन वंशीय असून त्यांचे आजोबा फ्रेडरिक ट्रम्प, जे पेशाने न्हावी होते, ते सुमारे १४० वर्षांपूर्वी जर्मनीतून अमेरिकेला गेले होते. 

एएफडीचे स्थानिक नेते थॉमस स्टीफन यांच्या मते, ट्रम्प यांनी इस्रायल-गाझा वाद मिटवण्यात आणि इस्रायली व आठ जर्मन बंधकांना सोडवण्यास मदत केली आहे, ज्यामुळे त्यांना हा सन्मान मिळणे योग्य आहे. या प्रस्तावावर २९ ऑक्टोबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. एएफडीने हा प्रस्ताव जिल्हा परिषदेसमोर ठेवला आहे. यावर जिल्हा प्रशासक हेंस-उलरिच यांनी मानद नागरिकत्व देण्यापूर्वी त्याच्या नियमांवर योग्य चर्चा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. जर्मनीमध्ये मानद नागरिकत्व अशा लोकांना दिले जाते ज्यांनी काही खास काम केले आहे, परंतु ट्रम्प यांना हा सन्मान देणे वादग्रस्त ठरू शकते. अनेक राजकीय निरीक्षकांना वाटते की हा प्रस्ताव केवळ एक दिखावा असून तो मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. तरीही, ट्रम्प यांचे या क्षेत्राशी असलेले जुने नाते आणि त्यांच्या कार्यामुळे या प्रस्तावाची सर्वत्र चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा फ्रेडरिक ट्रम्प हे जर्मनीतील काल्स्टाट या छोट्याशा गावातील होते. ग्वेंडा ब्लेअर यांच्या ‘द ट्रम्प्स : थ्री जनरेशन्स दॅट बिल्ट अॅन एम्पायर’ या पुस्तकात सांगितल्यानुसार, फ्रेडरिक यांचे बालपण खूप कठीण होते. आठ वर्षांचे असताना वडील वारल्यानंतर ते न्हावीचे काम शिकले. जर्मनीतील कठोर सैन्य कायद्यातून वाचण्यासाठी त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी (ऑक्टोबर १८८५ मध्ये) देश सोडला आणि ते न्यूयॉर्कमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी न्हावीचे दुकान सुरू केले.

फ्रेडरिक यांनी काही पैसे जमा करून अलास्कातील सोन्याच्या खाणीत गुंतवणूक केली. हा जुगार यशस्वी ठरला आणि ते लवकरच श्रीमंत झाले. १९०२ मध्ये ते जर्मनीला परतले, पण १९०४ मध्ये त्यांना 'स्टॅम्प घोटाळ्या'च्या आरोपावरून सैन्याच्या अधिकाऱ्यांनी देशातून हाकलून दिले. न्यूयॉर्कला परतल्यावर १९०५ मध्ये एलिझाबेथने फ्रेड ट्रम्प यांना जन्म दिला (डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील). फ्रेड यांनी १९२७ मध्ये 'एलिझाबेथ ट्रम्प अँड सन' नावाची रिअल इस्टेट कंपनी सुरू केली, जी अत्यंत यशस्वी ठरली.

- सुदेश दळवी