बिहारचा राजकीय इतिहास नेहमीच परिवर्तनाचा साक्षीदार राहिला आहे. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून ते मंडल युगापर्यंत, देशाच्या राजकीय विचारप्रवाहात बिहारने अनेकदा दिशा दिली आहे. आजही हा प्रदेश देशातील जातीय समीकरणे, सामाजिक न्याय आणि राजकीय एकात्मतेचा नवा नमुना बनू शकतो.
देशाच्या राजकीय क्षेत्रात सध्या सर्वांत अधिक चर्चिला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे विरोधकांचे ऐक्य टिकणार आहे का? काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस व स्थानिक पक्षांची इंडिया आघाडी कितपत एकत्रित राहू शकेल यावर चर्चा होताना दिसते आहे. या आघाडीसमोर अनेक अंतर्गत आव्हाने आहेत. विरोधी पक्षांनी सध्या तरी एकमेव लक्ष्य ठेवले आहे, ते सत्ताधारी एनडीए या भाजपप्रणित आघाडीला शह देत सत्ताभ्रष्ट करण्याचे. त्यासाठी म्हणजे सत्ताधारी भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी विरोधी गटांना एकत्र येण्याची गरज वाटते. बिहारमध्ये विरोधी गटांनी एकत्र येऊन सामाजिक न्याय, बेकारी व मतदानातील कथित फेरफार अशा विषयांवर लढण्याचा मानस केला आहे. विरोधकांनी वेळोवेळी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यात समन्वय, एकसंध नेतृत्व, स्पष्टीकरण यांचा अभाव दिसतो. बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रणनीती आखत आहे असे दिसत असले तरी जागा-वाटप, भागीदारांमधील टक्केवारी, आतंरिक स्पर्धा हे मोठे आव्हान बनले आहे. याच कारणास्तव झारखंड मुक्ती मोर्चाने महाआघाडीत सहभागी न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघटित विरोधी पक्ष अशी प्रतिमा जनतेसमोर नेण्यात इंडिया आघाडी अपयशी ठरली आहे. नेतृत्व व कार्यक्रम याबाबत स्पष्टता नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हणता येईल. जागा वाटपावरून निर्माण झालेला तणाव हे यामागचे कारण आहे. विरोधकांच्या आघाडीने सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यावर भर देण्यापेक्षा आपला सकारात्मक एजेंडा, काय बदल करू शकतात हे दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय, गरीबी, बेरोजगारी यांसारखे विषय जनतेसमोर नेणे शक्य आहे. देशातील मतदारांचा कल सामाजिक-आर्थिक बदलांच्या दिशेने आहे. विरोधी पक्षांनी हे लक्षात घ्यावे. जर विरोधी आघाडी एकरूप राहिली, तर सत्ताधारी पक्षावर दबाव वाढू शकतो. परंतु, मतभेदग्रस्त स्थिती असेल तर सत्ताधारी पक्ष फायदा घेऊ शकतो. बिहारसारख्या राज्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरला तर ते मोठे पाऊल ठरू शकते; परंतु यासाठी संघटनात्मक सुधारणाही आवश्यक आहे. विरोधी पक्षांचे ऐक्य आजच्या राजकीय स्थितीत केवळ संकल्पना नाही, तर ती रणनीतिक गरज आहे. मात्र त्यास साकार करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. नेतृत्व, समन्वय, भागीदारांमधील स्पर्धा, स्पष्टता आणि जनादेशाशी जुळणारे मुद्दे अशा काही समस्या पुढे येत असतात. आगामी निवडणुकांमध्ये या गोष्टींचे महत्व अधोरेखित होईल.
बिहारचा राजकीय इतिहास नेहमीच परिवर्तनाचा साक्षीदार राहिला आहे. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून ते मंडल युगापर्यंत, देशाच्या राजकीय विचारप्रवाहात बिहारने अनेकदा दिशा दिली आहे. आजही हा प्रदेश देशातील जातीय समीकरणे, सामाजिक न्याय आणि राजकीय एकात्मतेचा नवा नमुना बनू शकतो. त्यामुळे, बिहारमध्ये घडणारे राजकीय समीकरण राष्ट्रीय स्तरावर प्रतिबिंबित होणे अपरिहार्य आहे. एनडीएसाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. बिहारमधील त्यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि आत्मनिर्भर भारताची प्रतिमा पुन्हा तपासली जाणार आहे. नितीश कुमार आणि भाजप यांचे संबंध हे राज्यातील सत्तेच्या स्थैर्याचे प्रतीक असले तरी, मतदारांमध्ये असलेल्या असंतोषाचा परिणाम येथे दिसू शकतो. जर एनडीए बिहारमध्ये आपले वर्चस्व टिकवण्यात यशस्वी झाली, तर ती आगामी लोकसभा रणात आत्मविश्वासाने उतरेल. अन्यथा, विरोधकांना नवसंजीवनी मिळेल. बिहारच्या निवडणुकीत रोजगार, शिक्षण, स्थलांतर आणि विकास यांसारखे मुद्दे अग्रभागी आले आहेत.
हे मुद्दे फक्त प्रादेशिक नाहीत, तर देशाच्या संपूर्ण युवा मतदारवर्गाशी निगडित आहेत. म्हणूनच बिहारचा निकाल हे ठरवेल की मतदार अजूनही भावनिक मुद्द्यांकडे झुकतात की, आता ते आर्थिक वास्तव पाहू लागले आहेत. जर या निवडणुकीत विकासाधिष्ठित मतदान झाले, तर ती भारताच्या लोकशाहीतील प्रगल्भतेची खूण ठरेल. बिहारमधील निकाल फक्त एक राज्य ठरवणार नाही, तर तो राष्ट्रीय राजकारणातील नव्या सत्तासमीकरणांचा आराखडा बनवेल. एनडीए टिकली तर स्थैर्य आणि राष्ट्रवाद हा अजेंडा पुढे येईल. इंडिया आघाडीने प्रभाव दाखवला तर सामाजिक न्याय आणि संघटित विरोध हा संदेश देशभर पोहोचेल. आणि तिसरी शक्यता म्हणजे, मतदारांनी दोघांनाही नवा धडा दिला, तर प्रादेशिक राजकारणाला नवा आयाम मिळू शकतो. बिहार पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीकडे दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण, बिहारचे परिणाम पुढील लोकसभा निवडणुकांसाठीचे राजकीय वातावरण ठरवतील, हे जवळजवळ निश्चित आहे.