नेपाळ आणि बांगलादेशनंतर आता आफ्रिकेतही 'जन झी'च्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनामुळे आणखी एका देशाचे सरकार कोसळले आहे. मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अंद्री राजोएलिना हे देश सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती विरोधी पक्ष आणि अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष राजोएलिना यांनी राष्ट्रीय टीव्हीवरून एका अज्ञात ठिकाणाहून देशाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, सैन्यात झालेल्या बंडखोरीमुळे त्यांना आपल्या जीविताच्या रक्षणासाठी देश सोडावा लागला आहे. मात्र, यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्याची कोणतीही घोषणा केली नाही.
राजोएलिना गेले काही आठवडे 'जन झी'च्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनाचा सामना करत होते. एका विशेष सैन्य युनिटने आंदोलनात उडी घेतली आणि राष्ट्राध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यानंतर, राजोएलिना यांनी हिंदी महासागरातील या बेटावर सत्तेवर अवैध कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगून देश सोडण्याचा निर्णय घेतला. ‘मला माझ्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी जावे लागले’, असे राजोएलिना यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी संवादाचे आवाहन केले आणि संविधानाचा आदर राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी मादागास्कर कसे सोडले किंवा ते सध्या कुठे आहेत, हे स्पष्ट केले नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार त्यांना फ्रेंच लष्करी विमानाने देशाबाहेर नेण्यात आले आहे.
मादागास्करच्या सीएपीएसएटी या विशेष सैन्य युनिटने बंडखोरी करून, आता संपूर्ण सैन्य नियंत्रण आपल्या हातात असल्याचा दावा केला आहे. या युनिटचे प्रमुख, कर्नल मायकल रेंड्रियनरीना यांनी स्पष्ट केले की, सैन्य जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत आहे आणि हा कोणताही सत्तापालट नाही. त्यांचे सैनिक आता आंदोलकांसोबत आहेत आणि आठवड्याच्या अखेरीस झालेल्या संघर्षात त्यांचा एक सैनिक मारला गेला होता. राजधानीत सशस्त्र वाहनांमध्ये असलेल्या सैनिकांचे लोकांनी मादागास्करचे झेंडे फडकवत स्वागत केले. मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेजवळ असलेला एक मोठा बेट देश आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे ३.१ कोटी आहे. येथील लोक अनेक वर्षांपासून दारिद्र्य आणि सरकारी सेवांच्या अपयशाबद्दल नाराज होते, जी आता मोठ्या आंदोलनात बदलली आहे.
२५ सप्टेंबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन सुरुवातीला पाणी आणि विजेच्या टंचाईवरून सुरू झाले होते, परंतु हळूहळू हे आंदोलन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सरकारविरुद्धच्या व्यापक असंतोषात बदलले. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या 'जन झी'च्या नेतृत्वाखालील विरोध प्रदर्शनात आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने सुरुवातीच्या दिवसांमध्ये शांततापूर्ण आंदोलनांवर सरकारने केलेल्या हिंसक कारवाईची टीका केली होती. आंदोलकांनी इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःचे संघटन केले आणि नेपाळ तसेच श्रीलंकेतील अलीकडील जनआंदोलनांमधून प्रेरणा घेतली.
- सुदेश दळवी