आणखी एका देशात ‘जेन झी’द्वारे सत्तांतर

नेपाळपाठोपाठ तब्बल चार देशांमध्ये ‘जेन झी’ रस्त्यावर उतरले. ‘जेन झी’चे नेमके म्हणणे काय आहे? सत्ताधाऱ्यांना खाली खेचणे हाच त्यांचा उद्देश आहे की अन्य? यातून जगाने कोणता धडा घ्यायचा?

Story: विचारचक्र |
17th October, 11:44 pm
आणखी एका देशात ‘जेन झी’द्वारे सत्तांतर

आफ्रिका खंडातील मादागास्कर या द्विपावर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. मादागास्करचे राष्ट्रपती अँद्री रजोएलिना यांनी १४ ऑक्टोबर रोजी एका आदेशाद्वारे संसद बरखास्त केली. कारण, त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला जाणार होता; मात्र, संतप्त संसद सदस्यांनी बहुमताने रजोएलिना यांच्यावरील महाभियोग मंजूर केला. यामुळे देशात दुहेरी सत्तासंघर्ष निर्माण झाला. राष्ट्रपती विरुद्ध संसद. अर्थात याचे अन्य पडसादही उमटले. लष्कराच्या ‘कॅपसॅट’ या विशेष विभागाने तडकाफडकी सत्ता ताब्यात घेतली. कॅपसॅट प्रमुख कर्नल मायकेल रँड्रियनिरीना म्हणाले की, देशात तात्पुरते प्रशासन स्थापन केले जाईल आणि नंतर पुन्हा नागरी सरकारकडे सत्ता दिली जाईल.

मादागास्करमधील ही उलथापालथ अचानक झालेली नाही. ‘जेन झी’ (तरुणांनी)ने चालवलेले मोठे आंदोलन त्यास कारणीभूत आहे. देशात वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने तरुण अस्वस्थ झाले. किमान रोज लागणाऱ्या सुविधाही मिळत नसल्याने त्यांचा संताप झाला. त्यातच देशामध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यासह अन्य प्रश्नही उग्र झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. हळूहळू त्याची तीव्रता वाढत गेली. पोलिसांनी दडपशाही सुरू केली. पाठोपाठ लष्करातील काही युनिट्सनी आदेश पाळण्यास नकार देऊन तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. हजारो तरुण रस्त्यावर उतरले. याचदरम्यान हिंसक आंदोलनात २२ तरुणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या कॅपसॅटने संसद, निवडणूक आयोग आणि घटनाबाह्य संस्थांचे अधिकार स्थगित केले आणि राष्ट्रपतींच्या विरोधात सत्ता हस्तगत केली. आफ्रिकेत अलीकडच्या लष्करी बंडांच्या मालिकेत आणखी एक भर पडली आहे. तरुण पिढीच्या असंतोषातून उद्भवलेले हे बंड राजकीय प्रणालीतील खोलवरच्या समस्या दाखवत आहे. नजीकच्या काळात तेथे लोकशाही पुनर्स्थापना शक्य होईल का, हा मोठा प्रश्न आहे.

मादागास्कर द्विपावरील आंदोलन केवळ स्थानिक असंतोषाचे द्योतक नाही, तर ते नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. देशातील राजकीय अस्थैर्य, भ्रष्टाचार आणि मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे निर्माण झालेला संताप प्रदर्शित करतो. राजधानी अंतानानारिवो आणि संपूर्ण देश अस्थिर झाले आहे. ‘जेन झी मादागास्कर’ या तरुणांच्या संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची धार वाढविली. अखेर सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यात आले. मात्र, लष्कराने सूत्रे हाती घेतल्याने आंदोलन यशस्वी झाले का? युवकांना अपेक्षित असलेला बदल घडला का? आर्थिक संकट, वाढती बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील ढासळती व्यवस्था, सत्ताधाऱ्यांची उदासीनता, तरुणाईच्या आशा-आकांक्षा यांचा एकत्रित परिणाम म्हणून या आंदोलनाची ठिणगी पडली. नेपाळ, श्रीलंका, केनिया अशा विविध देशात ‘जेन झी’ यांनी आक्रमक होत बदलाचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्या देशांच्या राजकीय नकाशावर नवा अध्याय लिहिला जात आहे. या आंदोलनात जसा आशेचा किरण आहे तसेच धोकेही.

मादागास्कर समोरचा प्रश्न आता केवळ शासन बदलाचा नाही, तर व्यवस्था बदलाचा आहे. जर संक्रमणकाळात सैन्याने सत्ता जनतेकडे परत दिली, तर ही क्रांती सकारात्मक ठरू शकते. पण सत्तेची चव लागल्यावर सैन्य माघार घेईल का? देशातील न्यायसंस्था, निवडणूक आयोग आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमे यांचा स्वायत्तपणा जपला गेला, तरच लोकशाहीचे मूळ टिकेल. नागरिकांनीही जबाबदार राहून शांततामय बदलाला साथ देणे आवश्यक आहे. मादागास्करमधील आंदोलन हे आजच्या जगातील नव्या प्रवृत्तीचे प्रतीक आहे. सत्ता आणि व्यवस्था यांना तरुणाई प्रश्न विचारत आहे. ही लाट फक्त आफ्रिकेतच नव्हे, तर जगभर पसरत आहे. मादागास्करमधील परिस्थिती सुयोग्यरीत्या हाताळली गेली तर तो लोकशाहीचा नवा अध्याय लिहू शकतो. परंतु जर सत्तेचा खेळ जुन्याच पद्धतीने सुरू राहिला, तर इतिहास पुन्हा तोच चक्राकार फिरताना दिसेल.

जगभरात ‘जेन झी’ आंदोलनाची चर्चा सुरू आहे. १९९७ ते २००२ या काळात जन्मलेल्या तरुणाईला ‘जेन झी’ म्हटले जाते. हा जमाव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांबद्दल संवेदनशील आहे. पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या सार्वजनिक सुविधांचा अभाव, बेरोजगारी आणि संधींची कमतरता, भ्रष्टाचार, अन्याय, महागाई, लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न तसेच सोशल मीडियाच्या मदतीने संघटन ही ‘जेन झी’ची वैशिष्ट्ये आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील ‘जेन झी’च्या आंदोलनाचा उद्रेक आणि तेथे घडलेले सत्तांतर जगाने पाहिले आहे. चतुःसूत्रीवर ‘जेन झी’चा भर आहे. त्यात सोशल मीडियाचा रणांगण म्हणून वापर, अहिंसक पण ठाम भूमिका, लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापनेची मागणी आणि जागतिक प्रेरणा व एकात्मता यांचा समावेश आहे. ‘जेन झी’ केवळ आंदोलक नाही तर ते सरकारवरील दबाव गट आणि बदलाचे सूत्रधार झाले आहेत.

‘जेन झी’ आंदोलनाकडे सर्वंकषरीत्या पहायला हवे. ही अशी पिढी आहे की, जिला हवे ते इन्स्टंट (तातडीने) मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे संयमाचा अभाव आहे. यातूनच अघटित घडण्याची भीतीही आहे. ‘जेन झी’ हा समाजाचाच एक घटक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या घडामोडींचा अंदाज घेणे हे समाजानेही करायला हवे. जिथे ते चुकत असतील तेथे त्यांना योग्य ती समज देण्याची जबाबदारी समाजाकडेही आहे. केवळ सरकार, प्रशासन किंवा राजकारणी यांच्यावर सोपवून हे चालणार नाही. जबाबदारी प्रत्येक घटकाचीच आहे. जे चांगले आहे त्याचे कौतुक करणे, चूक असेल, तर ती सुधारणे आणि योग्य दिशेने जाण्यास भाग पाडणे हे सारे आव्हानच आहे. खासकरून आजच्या आधुनिक पिढीचे तर अधिकच. जगभरातील ‘जेन झी’ आंदोलनाच्या ठिणग्यांकडे एकत्रित पाहिले तर मोठी चळवळ निर्माण झाल्याचे दिसते. सर्वसामान्यांना खिजगणतीतही न धरणाऱ्या सत्ताधारी, हुकूमशहा, लष्करशहा आणि राजकारण्यांना सणसणीत चपराक लगावण्याची क्षमता ‘जेन झी’मध्ये आहे. मात्र, या ‘जेन झी’चा वापर कुणी करते आहे का? त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून वेगळाच निशाणा लावला जात आहे का? त्यांना मोठे बळ देऊन विध्वंसक काही घडवले जात आहे का? त्यांना भडकवण्याचे उद्योग होत आहेत का? याचीही खातरजमा करायला हवी. अन्यथा नागरी वस्तीत आणि समाजात वावरणारे ‘जेन झी’ हे दहशतवाद्यांपेक्षाही स्फोटक ठरण्याची भीती नाकारता येत नाही.


भावेश ब्राह्मणकर

(लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे 

अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)