दिवाळी : फिटे अंधाराचे जाळे

पर्यावरणीय नियमांचे पालन करून आपण दिवाळी सणाचा उत्साह, आनंद वृद्धिंगत करण्याची गरज आहे. दिवाळी हा प्रकाशाचा, सत्याचा आणि जीवनाच्या अभिवृद्धीचा सण असून, त्यादृष्टीने साजरा झाला पाहिजे.

Story: विचारचक्र |
21st October, 09:17 pm
दिवाळी : फिटे अंधाराचे जाळे

भारतीय लोकमानसात अन्न धान्यांच्या प्राप्तीनंतर साजरा होणारा दिवाळी हा उत्सव म्हणजे उजेडाचे पर्व आहे. मानवी समाजाच्या इतिहासात अग्नीचा शोध क्रांतिकारी होता. रानावनात, कंदमुळे भक्षण करत, नदी नाल्यांतील पाणी पिऊन जगणाऱ्या आदिमानवाच्या जीवनाला अग्नीच्या शोधाने प्रकाशमय केले. युगायुगांपासून काळ्याकुट्‌ट अंधारात चाचपडणाऱ्या आदिमानवाच्या जीवनात अग्नीच्या आगमनाने विलक्षण बदल घडले, निसर्गातील विविध शक्तीशी वावरत असताना, त्याला त्यांच्यातील दिव्यत्वाचा, भव्यत्वाचा साक्षात्कार झाला आणि त्यातूनच निसर्गातील नाना घटकांना देवत्व प्रदान करणाऱ्या लोकधर्माचा जन्म झाला. वृक्षवेली, पशुपक्षी यांच्यातील देवत्व अनुभवले असताना, त्यांच्यासमोर संधीकालाला दिवा पेटवून ठेवण्याचा विधी निर्माण झाला. परमेश्वरी अंश म्हणजे सत्य, सुंदर आणि मंगलाची उपासना, ही लोकधारणा समाजात दृढ झाल्यावर तेजाची आरती करण्याची परंपरा सुरू झाली असावी.

दिव्यांची आरास करण्यामागे मनाला झालेला, आनंद, उल्हास असून, केवळ भारतीयांतच दिवाळी साजरी करण्याची परंपरा नसून जगाच्या वेगवेगळ्या भागांत शेकडो वर्षांपासून मानवी समाज दिवाळी साजरी करत आलेला आहे. खिस्ती समाजात डिसेंबर २५ या दिवशी येशू ख्रिस्ताची जयंती नाताळ म्हणून साजरी करताना आपल्याकडच्या दिवाळीतील आकाशकंदीलाऐवजी ख्रिस्ती समाज आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्यांची प्रतिकृती शोभावी अशा कलाकृती प्रज्वलित करून येशूच्या जयंतीचा आनंद द्विगुणित करतात. गोडधोड खातात आणि एकमेकांशी आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम समाजात महंमद पैगंबराची जयंती ही मोठी उत्सवाची पर्वणी असते. परंतु जेव्हा त्यांच्यात शब ए बारात साजरी केली जाते, तेव्हा दिव्यांची आरास त्यांच्या घरादारांना प्रकाशमान करते.

बौद्ध धर्मियांसाठी गौतम बुद्धांची वैशाखातील पौर्णिमा ही दिवाळीच आहे. शाक्य कुलात जन्माला आलेला सिद्धार्थ अश्वत्थ वृक्षाखाली ध्यानमग्न असताना निरंजना नदीतीरी प्रबुद्ध झाला. मानवी समाजातील दुःखाचा शोध घेताना, वासना हे मूळ कारण असून, त्यातून जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी अष्टांग मार्ग स्वीकारणे आवश्यक असल्याचे बुद्धाने सांगितले. ग्रीष्म ऋतूतील उष्मा असह्यकारक होत असताना वैशाखातील पौर्णिमा रात्रीच्या वेळी आल्हाददायक करणारा हा उत्सव असतो. ही पौर्णिमा म्हणजे ज्ञानाचे मनोमनी दिवे प्रज्वलित करणारी दिवाळीच असते. गोव्यात भारताच्या अन्य प्रांताप्रमाणे दिवाळीचा सण शरद्‌ ऋतूत येतो. शारदीय चंद्रकळा मानवी मनात आशेच्या किरणांची पखरण करत पृथ्वीवर अवतरलेली असते, अशा कालखंडात आश्विन महिना निरोप घेताना आणि कार्तिकाचे आगमन होत असताना दिवाळीचे आगमन होते. पावसाची कंटाळवाणी रिपरिप थांबलेली असायची, काळ्या ढगांनी आक्रंदलेले आकाश निरभ्र होऊ लागायचे आणि विस्तीर्ण, निळ्या आकाशात असंख्य तारका लखलखू लागायच्या. त्यांच्या प्रकाशातून मानवी मनाला आपल्या पितरांना आसमंतात आकाशदिवे टांगून दिवाळी साजरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली असावी. त्यामुळे दिवाळीच्या पर्वकाळात आकाशकंदील, मालीच्या पणत्या लुकलुकत अंधकारमय मानवी जीवनाला सत्य, जीवन आणि प्रकाशा‌ची प्रेरणा द्यायच्या.

जैन धर्म परंपरेत चौविसावा तीर्थंकर म्हणून वर्धमान महावीर वंद‌नीय ठरलेले आहे. अहिंसा, सत्य, दया, क्षमा, शांती आणि मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी वर्धमान महावीरांनी भारतीय लोकमानसात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. महावीरांचे निर्वाण कार्तिकातील बलिप्रदेपूर्व येणाऱ्या आश्विन चतुर्दशीला झाले. महावीर हे तेजाचे आणि अलौकिक करुणेचे व्य‌क्तिमत्त्व होते. त्यांनी मारामारी, रक्तपात, हिंसा यांनी बरबटलेल्या तत्कालीन मानवाच्या जीवनातील भयाण अंधःकार दूर  केला होता आणि सद्‌विचार, सुवर्तन आणि सत्य ज्ञानाच्या प्रकाशाद्वारे जगणे अर्थपूर्ण केले होते. त्या महापुरुषाच्या निर्वाणाने तेजस्वी प्रकाशाचा स्त्रोत आपल्यातून देह रूपाने लोप पावला आणि म्हणून वेदनेच्या अंधाराच्या गर्तेत गटांगळ्या खाण्यापेक्षा दिव्यांची आरती निर्माण करून आमचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी जैन दिवाळीची परंपरा निर्माण झाली. भारतीय धर्मांनी इथल्या लोकमानसाला दिवा प्रज्वलित करून सत्याकडे, अंधाराकडून उजे‌डाकडे आणि मृत्यूकडून जीवनाकडे जाण्याचा संदेश दिलेला आहे.

गोव्यात एकेकाळी आजच्यासारखी नरकासुर प्रतिमा करण्याची परंपरा नव्हती. भाताची कापणी झाल्यावर जे अन्न लाभले, त्यामागे अगम्य अशा शक्तीचा वरदहस्त आहे आणि त्यासाठी धन‌दौलतीची देवता म्हणून लक्ष्मीची पूजा आश्विन महिना निरोप घेण्याच्या तयारीत असताना कृष्ण पक्षातील चतुर्दशीला दिवाळी साजरी करण्यात येऊ लागली की, त्यामुळे शेतमळ्यातील भाताची कणसे कापल्यानंतर जे गवत शिल्लक राहायचे, ते बांबूच्या सांगाड्यात घालून नरकासुर म्हणून दहन करण्याची परंपरा कालांतराने विकसित झाली असावी. आज नरकासुराची लोखंडी सळ्यांचा वापर करून आणि प्रदूषणकारी घटकांद्वारे महाकाय प्रतिमा तयार करून, ध्वनी प्रदूषण निर्माण करण्यास, कर्णकर्कश संगीताद्वारे गोंधळ करणाऱ्याचे प्रस्थ  परिसरातील सौजन्य, शिस्त आणि समाधानाचा बट्याबोळा करत आहे. सरकारने नरक चतुर्दशी साजरी करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. परंतु असे असताना यापूर्वी सण उत्सवप्रसंगीचा आगाऊपणा आणि अतिउत्साह अंगलट येऊन व्याध्रीग्रस्तांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचे पालन करून आपण दिवाळी सणाचा उत्साह, आनंद वृद्धिंगत करण्याची गरज आहे. दिवाळी हा प्रकाशाचा, सत्याचा आणि जीवनाच्या अभिवृद्धीचा सण असून, त्यादृष्टीने साजरा झाला पाहिजे.

दिवाळीचा सण सुंदर प्रकाशाचा

आकाशकंदीलांच्या तेजाचा

सत्य, शांती, सदाचार या सद्गुणांचा

भयाण अंधारावर मात करण्याचा

हा सण अक्षय सोहळा सुखनिधीचा


- राजेंद्र पां. केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५)