संजयाने आपली मान डोलावली. तो आपल्या मनात म्हणाला की इथे अमृताच्या एवढ्या सरी बरसल्या खऱ्या, पण धृतराष्ट्र महाराज इथे असूनही इथे नव्हते! जणू ते कुठल्या तरी लांब असलेल्या गावाला गेले होते!
मागील अंकांत आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील तेहतिसाव्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनाच्या - सुखाचा बुरखा घेऊन दु:ख हे प्राण्यांना (जीवांना) छळते. आनंदाची सकाळ होते न होते तोच दु:खाचा अंधकार नजरेसमोर यायला लागतो. पोटात गर्भ असतो. त्याचा जन्म अजून व्हायचाच असतो. पण काही बाबतीत त्याचा जन्म व्हायच्या आधीच तिथे पोटातच त्या गर्भाला मृत्यू कवटाळतो! या भागापर्यंत आलो होतो. आता इथून पुढील भाग पाहू.
जे अजून नाहीच त्याची चिंता चालू होती, तर तेही हारपून गेले! आणि हे अर्जुना, ते कुठे गेले, कोणी नेले, कसे नेले यातील काहीच कळत नाही, अशी स्थिती आहे! जे मृत्युमुखी गेलेत ते परत येत नाहीत आणि शोधूनही सापडत नाहीत! नेहमी मरणाच्याच वार्ता निरंतर चालू असतात. पुराणं पण त्यांचीच होतात! सर्वांचा निर्माता जो ब्रह्मदेव त्याचाही अंत होतो असे म्हणतात! म्हणजे अशाश्वतता इथे इतक्या प्रचंड प्रमाणात आहे. यात अर्जुना, महदाश्चर्य हे आहे की या अशा नांदणुकीच्या मृत्युलोकात जन्मणारे लोक माझी सर्वार्थाने उपेक्षा करत बेभानपणे निश्चिंत राहतात! इह-परलोकी कल्याण व्हावे हा हेतू मनात धरून कवडीही खर्च करत नाहीत; आणि जिथे सर्वस्वाच्या हानीची खात्री आहे, तिथे कोट्यांनी द्रव्य खर्च करतात! जो भोग-विलासात आकंठ बुडालाय तो "सुखी आहे" असे मानतात; आणि ज्याच्याकडे व्यर्थ आशांचे अपरंपार ओझे आहे तो "ज्ञानी आहे" असे समजतात!
ज्यांच्या बळ-बुद्धीला ओहोटी लागून आयुष्य थोडेच राहिले आहे, अशा वृद्धांना वडील मानून त्यांचे चरण वंदन करतात. बाळ वर वर जसजसा वाढतो तसे तसे त्याचे कौतुक होऊन आनंद व्यक्त केला जातो. पण आतून खरे तर त्याचे आयुष्य कमी कमी होत असते याची त्यांना तिळमात्र खंत नसते! जन्मल्यापासून दिवसेंदिवस तो काळाच्या स्वाधीन होत असतो; पण तरीही त्याचा वाढदिवस गुढ्या उभारून आनंदाने साजरा करण्यात येतो!
"जा आता मर जा," असे कोणी म्हटले तर ते यांना सहन होत नाही. आणि एखादी व्यक्ती मरण पावली की लोक आक्रंदत दु:ख व्यक्त करतात. आयुष्य क्षणोक्षणी जरी कितीही ओहोटत असले तरी मूर्खपणा करून ते यांच्या लक्षात येत नाही! निम्मा सापाच्या तोंडात असूनही बेडूक समोर बसलेल्या माशीला खाण्यासाठी वेंटाळण्याचा (म्हणजे आपल्या लांब जिभेने त्या माशीला तोंडात ओढण्याचा) प्रयत्न करायचा सोडत नाही! अर्धा सापाच्या तोंडात गेलेला असून देखील जगण्याची आशा तो सोडत नाही.
अशा प्रकारची आशा-तृष्णा-लोभ बाळगून आणि वाढवून प्राण्याला नेमका काय लाभ मिळतो, कोणास ठाऊक! असा उफराटा व्यवहार पाहून अंगावर काटा उभा राहतो.
हा! हा! हा! अरे अर्जुना, तू अशा मृत्युलोकात तू येथे अवचित जन्म घेतला आहेस. आता तरी निश्चयपूर्वक अंग झटकून तू वेगाने इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न कर. भक्ति-पंथाला लाग. तसे केलेस तरच तुला माझ्या निष्कलंक निर्दोष स्वरूपाचा लाभ होईल.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ।।३४।।
सरळ अर्थ : केवळ मज सच्चिदानंदघन वासुदेव परमात्म्याचे ठिकाणीच अनन्य प्रेमाने नित्य निरंतर अचल मन ठेवणारा हो. आणि मज परमेश्वरालाच श्रद्धायुक्त प्रेमासह निष्कामभावाने माझे नाम गुण व प्रभाव याचे श्रवण कीर्तन मनन व पठणपाठण करीत निरंतर भजणारा हो. तसेच शंख चक्र गदा पद्म आणि किरीट कुंडलादि भूषणांनी युक्त पितांबर वनमाला आणि कौस्तुभमणी धारण करणाऱ्या मज विष्णूचे मन, वाणी व शरीराद्वारे सर्वस्व अर्पण करून अतिशय श्रद्धा भक्ती व प्रेम यांनी विव्हल होऊन पूजन करणारा हो. आणि सर्वशक्तिमान विभूतिबल ऐश्वर्य, माधुर्य, गंभीरता, उदारता, वात्सल्य आणि सुहृदता इत्यादि गुणांनी संपन्न सर्वांचा आश्रयरूप अशा मज वासुदेवाला विनयभावपूर्वक भक्तिसहित साष्टांग दण्डवत् प्रणाम कर. याप्रमाणे मला शरण होऊन राहणारा तू आत्म्याला माझ्यामध्ये योजून (ऐक्य करून) मलाच येऊन मिळशील.
विस्तृत विवेचन : अर्जुना, तू सदासर्वदा माझे ठायी मन ठेवून प्रेमभावे माझे भजन कर. सर्वांच्या ठायी मीच एक आहे हे तत्वतः समजून घेऊन निरंतर नमस्कार कर. माझ्या सततच्या स्मरणाने संकल्प समूळ जाळून टाक. हेच माझे निर्मळ यजन होय. येणेकरून मन निर्विकल्प होते. अशा रीतीने संकल्प-विकल्प आपोआप निघून गेले की तू सर्वथा मद्रूप होशील. सर्वांपासून जे लपवून ठेवलेले होते ते हे माझे अंतरीचे गुज, निज-गुह्य-ज्ञान आज मी तुला इथे सांगितले आहे. याच भक्तिपंथाने त्याचा तुला लाभ होऊन तू सहजगत्या स्वतःच सुख-स्वरूप होशील, असे तो भक्त-काम-कल्पद्रुम परब्रह्म मेघश्याम कुंतीपुत्र पार्थास म्हणाला.
एवढे सांगून झाल्यावर संजय धृतराष्ट्राला म्हणाला की कृष्णार्जुनांमधील हा संवाद आपल्या ध्यानी आला का? परंतु नदीच्या पुरात जाऊन ढम्मपणे बसलेला रेडा जसा काही केल्या उठत नाही, तसा तो म्हातारा धृतराष्ट्र स्तब्ध बसून राहिला! संजयाने आपली मान डोलावली. तो आपल्या मनात म्हणाला की, इथे अमृताच्या एवढ्या सरी बरसल्या खऱ्या, पण धृतराष्ट्र महाराज इथे असूनही इथे नव्हते! जणू ते कुठल्या तरी लांब असलेल्या गावाला गेले होते! त्या मूर्खपणाच्या कृतीमुळे ते या अमृतपानाला मुकले. पण काहीही झाले तरी ते माझे धनी आहेत, स्वामी आहेत. त्यांना मी बोल लावता कामा नये. नाहीतर माझ्या वाचेला दोष लागेल. म्हणून आता ते महाराजांना परत सांगणे नको.
(क्रमशः)